लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता बारावीच्या परीक्षेचा शहरातील बहुतेक सीबीएसई शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शहरातील शाळांकडून प्राप्त निकालावरून वानवडी येथील आर्मी पब्लिक स्कूलमधील नंदिनी देसीराजू ही विद्यार्थीनी ९८.२ टक्के गुणांसह शहरांत पहिली तर दिल्ली पब्लिक स्कूलमधील अक्षत चुघ हा ९८ टक्के गुण मिळवून दुसरा आल्याची शक्यता आहे. ‘सीबीएसई’मार्फत रविवारी इयत्ता बारावीचा निकाल आॅनलाईन जाहीर केला. निकालामध्ये देशात यंदाही मुलींनी बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९.५ने अधिक आहे. देशात एकूण ८७. ५० टक्के मुली तर ७८ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहे. देशभरातील हा कल पुण्यातही दिसून येत आहे. शहरात मानसनिती शाखेतील नंदिनी राजू हिला सर्वाधिक ९८.२ टक्के गुण मिळाल्याचे दिसून येते. त्याखालोखाल ९८ टक्के गुण मिळविलेला अक्षत हा जेईई (मुख्य) परीक्षेत महाराष्ट्रात पहिला तर देशात सातवा आला होता. औंध येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधील विज्ञान शाखेतील रोहित सहस्त्रबुद्धे तर वाणिज्य शाखेतील इशा धर्मानी यांनी ९७.४ टक्के गुण मिळवत शहरात तिसरा क्रमांक मिळविल्याचे दिसते.दिल्ली पब्लिक स्कूल शाळेचा निकाल १०० टक्के लागला. शाळेतील १२६ विद्यार्थ्यांपैकी ७३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. शाळेतील अक्षत चुघ याने ९८ टक्के गुण मिळवित शाळेत पहिला क्रमांक पटकावला. त्याला गणित आणि संगणकशास्त्र या दोन्ही विषयांत १०० गुण मिळाले आहेत. विज्ञान शाखेत शिवांग दलाल (९५.८ टक्के) आणि समृद्धी बोथरा (९५.६ टक्के) यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. शाळेमध्ये वाणिज्य विज्ञान शाखेतून तनया गुप्ता (९६ टक्के) ही पहिली आली आहे. तर अर्जुन खुराणा (९५.६ टक्के) आणि यतीन आदित्य ध्रिंगा (९४.८ टक्के) हे अनुक्रमे दुसरे व तिसरे आले. मानसनिती या शाखेमधून एम. व्ही. संप्रिती (९४.६ टक्के), सुखमणी माल्ही (९४ टक्के) आणि वनजा तुलसी शेट्टी (९३.८ टक्के) या तिघी अनुक्रमे पहिल्या तीन टॉपर ठरल्या. औंध येथील डीएव्ही पब्लीक स्कुलमधील ६७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.1 वानवडी येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण ३०५ विद्यार्थ्यांपैकी २२ जणांना ९५ टक्क्यांहून अधिक तर ५१ जणांना ९० ते ९५ टक्के गुण मिळाले. अमोघ रत्नपारखी याने विज्ञान शाखेत ९७.२ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर वाणिज्य शाखेत पौर्णिमा जोसेफ ही विद्यार्थीनी ९५.४ टक्के गुण मिळवून पहिली आली. 2खडकी येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकालही शंभर टक्के लागला असून विज्ञान शाखेत किर्ती ही विद्यार्थीनी ९५.४ टक्के गुण मिळवून पहिली आली. तर तिस्ता सिंग (९४ टक्के) आणि अस्मिता सेन (९४.६ टक्के) यांनी अनुक्रमे वाणिज्य व मानसनिती या शाखेत प्रथम क्रमांक मिळविला.3बाणेर येथील आॅर्चिड शाळेमध्ये श्री दिव्य श्रेया गांगुला हा विद्यार्थी ९३ टक्के गुणांसह प्रथम आला. तर राघव अय्यंगार (९१.२ टक्के) आणि शुभंकर गायकवाड (९० टक्के) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.२३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुणवानवडी येथील सिटी इंटरनॅशनल स्कुलचा निकाल ९७.५ टक्के लागला असून श्रमोना रॉय हा ९७.२ टक्के मिळवून पहिला आला आहे. तर त्याखालोखाल शामसुंदर गौड (९५.६ टक्के) आणि यु. प्रतिक्षा (९५.४ टक्के) यांचा क्रमांक लागला. शाळेतील २३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले.संस्कृती शाळेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. शाळेतील ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले असून ७० टक्के विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना ६८ टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत. निशांत रमण या विद्यार्थ्याने ९६ टक्के गुण मिळवत पहिला येण्याचा मान मिळवला. तर माहिक मिलिंद जोशी हिला (पीसीबी) ९५.३ टक्के गुण मिळाले आहेत.
बहुतेक शाळांचा निकाल शंभर टक्के
By admin | Published: May 29, 2017 2:44 AM