पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ६ सप्टेंबर २०१५ रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेच्या निकालाची तपासणी करण्यासाठी येत्या १५ जानेवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी)समिती विद्यापीठाच्या सेट विभागाला भेट देणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला सेट परीक्षेचा निकाल येत्या २० जानेवारीपर्यंत जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला तीन परीक्षांनतर प्रत्येक वेळी यूजीसीकडे सेट परीक्षा आयोजित करण्याची परवानगी मागावी लागत होती. मात्र, विद्यापीठाने यूजीसीकडून एकदम सहा परीक्षा घेण्याची परवानगी मिळविली. त्यातील पहिली परीक्षा ६ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. विद्यापीठाने या परीक्षेचा निकाल सुमारे महिनाभरापूर्वीच सेट विभागाने तयार करून ठेवला होता. परंतु, यूजीसीच्या समितीकडून तपासून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येत नव्हता. आता येत्या १५ जानेवारी रोजी यूजीसीच्या समितीपुढे सेटचा निकाल तपासणीसाठी ठेवला जाणार आहे. त्यानंतर १५ ते २० जानेवारीपर्यंत सेटचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. विद्यापीठातर्फे सेट विभागातर्फे ६ सप्टेंबर रोजी ३१ वी सेट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस ८२ हजार १६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील ६७ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. तर, १४ हजार ४०८ विद्यार्थी अनुपस्थित होते. उत्तरसूची दिली जात असल्यामुळे किती गुण मिळतील, हे माहीत आहे.
सेट परीक्षेचा निकाल २० जानेवारीपर्यंत
By admin | Published: January 07, 2016 1:43 AM