पुणे : चार महिने झाले तरीही सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे घेतलेल्या सेट परीक्षेचा निकाल अद्याप लागला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. परंतु, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) समितीकडून निकाल तपासून घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाणार असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निदेर्शानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची सेट परीक्षा घेतली जाते. त्यानुसार विद्यापीठाने २३ जून २०१९ रोजी सेट परीक्षा घेतली होती. या परीक्षेस नोदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७९ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. तर २२ हजार ६९५ विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षा दिल्यानंतर युजीसीच्या नियमावलीनुसार सर्व विषयांची उत्तर सुची जाहीर करावी लागते. तसेच त्यावर विद्यार्थ्यांकडून हरकती मागविल्या जातात. प्राप्त झालेल्या हरकती तज्ज्ञ समिती समोर ठेवून त्यात आवश्यकतेनुसार बदल केला जातो. त्यामुळे परीक्षेनंतर तात्काळ निकाल जाहीर करणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे निकाल तयार असला तरी निकाल जाहीर करण्यापूर्वी युजीसीच्या समितीसमोर मंजूरीसाठी ठेवावा लागतो. परिणामी निकाल जाहीर करण्यास काही महिन्यांचा अवधी जातो. मात्र, चार महिने झाले तरीही निकाल जाहीर झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून निकालाबाबत विचारणा केली जात आहे.सेट विभागातील परीक्षा समन्वयक डॉ. बाळासाहेब कापडणीस म्हणाले, विद्यापीठातर्फे युजीसीच्या नियमांचे पालन करून निकाल जाहीर केला जातो. युजीसीच्या समितीकडून निकाल तपासून घेण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. युजीसीची समिती निकाल तपासणीस केव्हा येणार हे येत्या मंगळवारी (दि.२४) समजणार आहे. त्यामुळे सेट परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विद्यापीठातर्फे घेतलेल्या सेट परीक्षेचा निकाल ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 7:28 PM