पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पहिली ते थेट अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या राज्य मंडळाच्या शाळांमधील शिक्षकांची निकाल तयार करण्याची धावपळीत सुरू असून सीबीएसई व इतर बोर्डाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नियमित ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. तर राज्य मंडळाच्या शाळांचे ऑनलाइन वर्ग येत्या जून महिन्यात सुरू होतील, असे शिक्षण विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा अनेक महिने बंद होत्या. कोरोना परिस्थिती सुधारल्यामुळे काही जिल्ह्यांमधील प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाळा काही दिवस सुरू झाल्या. परंतु, वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे पुन्हा राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आर्थिक परिस्थिती आणि नेटवर्क कनेक्टिविटी आदी कारणांमुळे सर्वांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे शासनाने इयत्ता पहिली ते आठवी आणि त्यानंतर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्ग उन्नती देण्याचा निर्णय घेतला. तसेच आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, आपला अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या शिक्षकांनी आता तो पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र, परीक्षा घेतल्या जाणार नसल्याने विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाबाबत गांभीर्य नसल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे. तसेच सर्व अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच राज्य मंडळाच्या शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरू होते. त्यामुळे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सध्या बंद आहेत.
आरटीईचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
एसएससी व एचएससी बोर्डाच्या शाळा बंद असल्या, तरी सीबीएसई व इतर बोर्डाच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यापासूनच सुरू होते. त्यामुळे सध्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत ३० एप्रिलनंतर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सध्या ऑनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रियेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे.