कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे बारावीचा अंतिम निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया केली जात आहे. सध्या राज्य मंडळांकडून निकालाच्या माहितीचे संकलन सुरू आहे. राज्यातील तब्बल १३ लाख १७ हजार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी व पालक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, राज्य मंडळाने ऑनलाईन परीक्षा अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक अवगत करून दिले आहेत. मात्र, ज्यांना स्वत:चे बैठक क्रमांक माहीत नाही, अशा विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाच्या http s://mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून माहिती प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे केले आहे.
-----------------------------------
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याबाबत शिक्षण विभागाकडून काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक लिंकवर बारावीचा निकाल पाहता येईल,याबाबत शिक्षण मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ