लोकतंत्र सेनानी संघ : 25 जून हा काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात ज्यांनी बंदिवास सोसून आपल्या जिवाची व भविष्याची पर्वा न करता लोकशाहीची पुनर्स्थापना केली. अशा सर्व व्यक्तींचा सन्मान करण्याचे धोरण ठरवले आहे. या धोरणानुसार २ जानेवारी २०१८ पासून महाराष्ट्रातील ३३,४५२ जणांना मानधन मिळत होते. परंतु, ३१ जुलै २०२० च्या शासन निर्णयानुसार मानधन थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या संदर्भात न्यायालयाने निर्देश देऊनही शासनाने मानधन दिले नाही. ते पुन्हा सुरू करावे, अशी मागणी लोकतंत्र सेनानी संघ यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी खासदार गिरीश बापट यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. लोकतंत्र सेनानी संघ यांची आभासी बैठक गुगल मिटवर पार पडली. या बैठकीत ३५ सदस्य उपस्थित होते. बैठकीची सुरुवात मुरलीधर घळसासी यांच्या वैयक्तिक पद्याने झाली. त्यानंतर सुधीर बोडस यांनी कार्यक्रमाची माहिती देऊन संघटनेमार्फत जिल्हाधिकारी पुणे यांना दिलेल्या पत्राचे वाचन केले.