लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढव्यात पनवेल येथील व्यावसायिकाला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून त्याला लुबाडण्याचा प्रकार समोर आला असतानाच चंदननगर येथील एका एअरफोर्समधील निवृत्त अधिकाऱ्यालाही ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दत्ता ऊर्फ यादव कुऱ्हाडे (वय ४८, रा. लवणवाडी, जुन्नर), उत्तम कान्हुजी कुऱ्हाडे (वय ४०) नारायण जाधव (वय ३७, रा. कैवानमळा, जुन्नर) यांच्यासह चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी चंदननगर येथील एका ५९ वर्षांच्या निवृत्त एअर फोर्स अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे एअरफोर्समधून २००१ मध्ये निवृत्त झाले आहेत. ते विमाननगर येथील युनियन बँक ऑफ इंडिया येथे गेले असताना ‘आरती चौधरी’ असे नाव सांगणाऱ्या एका तरुणीने त्यांना फोन केला. नोकरीची चौकशी केली. त्यावेळी फिर्यादी याने आपण व्यवसाय करीत असून माझ्याकडे काही नोकरी नसल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित तरुणीने व्हाॅट्सअॅपवर त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांची सर्व माहिती घेऊन त्यांच्याबरोबर प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर त्यांना १२ ऑगस्ट रोजी नारायणगाव येथे बोलावले. तेथून तिने त्यांना एका ठिकाणी घेऊन गेले. त्यांच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तेथे तिचे नातेवाईक आले. तेव्हा तिने फिर्यादी याने आपल्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध केल्याचे खोटे सांगितले.
त्यावर त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांच्या गळ्याला कुऱ्हाड लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हे प्रकरण मिटविण्यासाठी फिर्यादी याच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती फिर्यादी याच्याकडून युनियन बँक ऑफ इंडियाचे १० लाख रुपयांचे तीन धनादेश जबरदस्तीने लिहून घेतले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. या प्रकारानंतर सोमवारी पुन्हा फिर्यादींना फोन करुन आरोपींनी पैशांची मागणी केली. तेव्हा फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. विमानतळ पोलिसांनी तातडीने कारवाई करुन पैसे घेण्यासाठी आलेल्या दोघांना सापळा रचून अटक केली. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवदास लहाने तपास करीत आहेत.