लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाकाळात निवृत्त अधिकारी आणि जवान यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी तसेस त्यांना तत्काळ आरोग्यसेवा मिळावी या हेतूने दक्षिण मुख्यालयातर्फे समर्पित हेल्पसेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरद्वारे दूरध्वनीवरून जवानांना संपर्क करून त्यांच्या आरोग्याविषयक माहिती घेऊन त्यांना सेवा पुरवली जात आहे. यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याचीही नेमणूक दक्षिण मुख्यालयामार्फत करण्यात आली आहे.
सेवेत असलेल्या अधिकारी आणि जवानांना कोरोनाकाळात चांगली आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी लष्करी आरोग्य सेवेमार्फत अनेक उपाययोजना करण्यात आल्या. सीमेवर तसेच देशात अनेक ठिकाणी कार्यतप्तर असलेल्या जवानांना चांगली आरोग्य सुविधा देण्यात आली. मात्र, निवृत्त अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांचेही कोरोनापासून संरक्षण व्हावे ही आमची जबाबदारी असल्याचे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्याच पार्श्वभूमीवर निवृत्त अधिकारी, जवान तसेच त्यांच्या कुटुंबात असेलल्यांसाठी मुख्यालयातर्फे समर्पित आरोग्य हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरद्वारे दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांशी या हेल्प सेटरतर्फे संपर्क साधला जात आहे. यासोबतच आरोग्यासंबंधी येणाऱ्या अडचणींचीही माहिती घेतली जात आहे. त्यांना अडचणींचे वर्गीकरण करून त्यांना तातडीची आरोग्य सुविधा या सेंटरतर्फे दिली जात आहे.
माजी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये एखादा व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, त्यांना माजी सैनिक हेल्थ स्कीम (इसीएचएस) आदींची माहिती या हेल्थ सेंटरद्वारे पुरवली जात आहे. सेवेत असलेले सैनिक, अधिकारी, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याबाबत दक्षिण मुख्यालय कटिबद्ध आहे. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. यासाठी हे केंद्र कार्यकरत आहे, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
चौकट
स्वतंत्र पथकाची स्थापना
या हेल्थ केअर सेंटरमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक पथक कार्यरत आहे. दिवसातून सहा ते आठ तास माजी सैनिकांना दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांच्या समस्या या पथकाद्वारे जाणून घेतल्या जात आहे. या केंद्राचे नियोजन एक कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे.
कोट
दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांच्याशी सर्पक केला. त्यांना निवृत्त अधिकारी जवानांना भेडसावणाऱ्या समस्या कथन केल्या. सुमारे अर्धा तास त्यांनी माझे म्हणने समजून घेतले. यावर आमच्या सर्वसमस्या सोडवण्यासाठी दक्षिण मुख्यालय कटिबद्ध असल्याचे त्यांची सांगितले.
- प्रकाश कलावर, निवृत्त विंग कमांडर