नऱ्हे : पार्किन्सनच्या आजाराला कंटाळून आणि इच्छामरणाला परवानगी नसल्याने वायू सेना अधिकाºयाने (निवृत्त) इमारतीवर जाऊन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) सरिता विहारमध्ये सोमवारी सायंकाळी सव्वाचार वाजता घडली.सुधाकर परांजपे असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले आहेत. ते मूळ मुंबईमधील होते. १९६० साली वायुसेनेत दाखल झाले होते. १९६० ते १९८६ या २६ वर्षांच्या काळात वायुसेनेत त्यांनी उत्कृष्ट काम केल्याने त्यांना तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानितही करण्यात आले होते.१९८६ साली पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी दोन वर्षे पानशेतजवळ सोनापूरला रुग्णांची सेवा केली. त्यानंतरची दोन वर्षे त्यांनी दौंडजवळील केडगावलाही घरोघरी शौचालय बांधण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यानंतर पुण्यात त्यांनी असंख्य अपंग लोकांना मदत केली. दारूबंदी जनजागृतीसाठी त्यांनी विविध पथनाट्येही बसविली होती. पेन्शनचे पैसे ते समाजकार्यासाठी खर्च करीत होते. त्यांनी लिहिलेल्या मेक २१ क्रॅश विमान संबंधित ‘फ्लाईट डेटा रेकॉर्डर’ हे पुस्तक अजूनही वायुसेनेच्या मेक २१च्या ट्रेनिंगसाठी वापरले जाते.गच्चीवर फिरून येतो...‘तू भाजी कर, मी जरा गच्चीवर फिरून येतो असे पत्नीला सांगून त्यांनी आपल्या केअर टेकरला बोलावून माझी आता जायची वेळ आली आहे असे म्हणून त्यांनी पुढील दोन महिन्यांचे आगाऊ पैसे देऊ केले. त्याला घेऊन गच्चीवर गेलेले वायुसेनेचे सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन सुधाकर परांजपे यांनी त्याला सांगितले की, माझं पुस्तक आण, तो खाली गेलेला दिसताच त्यांनी घड्याळ, टोपी, चपला काढून गच्चीवरून उडी टाकून आत्महत्या केली.माझ्या बाबांनी आयुष्यभर देशसेवा व समाजसेवा केली मात्र त्यांना अशा पद्धतीने आत्महत्या करावी लागली याचं दु:ख होत आहे. सरकारने इच्छामरणासाठी काही निकष ठेवून परवानगी द्यायला हवी.- अजय परांजपे, थोरला मुलगा
आजाराला कंटाळून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 3:08 AM