पृथ्वीराज जाचक यांचा आरोप
लासुर्णे : छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील सभासदांची एफआरपी, कामगारांचे पगार, पुरवठादारांची बिले, बँकांची व वित्तीय संस्थांची शेकडो कोटी रुपये देणी, सभासदांची पावणे दोन कोटी रुपये ठेवीची मुदत संपून एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. अशा परिस्थितीतून कारखाना जात असताना संचालक मंडळ कारखान्याच्या हिताचे निर्णय न घेता कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या मुलांचे पुनर्वसन करत असल्याचा आरोप शेतकरी कृती समितीचे पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे.
छत्रपती कारखान्याची सध्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानादेखील छत्रपती कारखाना ऊसउत्पादक सभासदांच्या हितासाठी काम करत आहे की कारखान्यातील सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या मुलांचे पुर्नवसन करत असल्याचा आरोप जाचक यांनी केला आहे. कारखान्यास गाळप क्षमतेच्या प्रमाणात ऊसपुरवठा होत नाही व सातत्याने दर कमी दिल्याने सभासद नाराज आहेत. कारखान्यामध्ये स्टफिंग पॅटर्नला बगल देऊन काही सेवक घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र काही उमेदवारांना मुलाखत न घेता व ते उमेदवार पात्र नसतानादेखील कोणीतरी शब्द दिला आहे आणि तो दिलेला शब्द पाळायचा आहे म्हणून अशा उमेदवारांना नेमणूक केली आहे.
स्वत:चा शब्द पाळण्यासाठी एका सहकारी साखर कारखान्याला व सभासदांना वेठीस धरणे योग्य हे कितपत योग्य आहे. या कारखान्यात अशाच चुकीच्या पद्धतीने चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ते कामावर असताना अमली पदार्थाचे सेवन करून येतात, अशा अधिकाऱ्यांची नेमणूक म्हणजे कारखान्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. गेली अठरा वर्षे कारखान्याचे हित डावलून चुकीचे निर्णय घेतल्याने कारखान्याची ही आजची अवस्था आहे. साखर विकली जात नाही म्हणून पैसे देता येत नाहीत असे सांगणे योग्य नाही. कारण पूर्वी साखरेला ऐंशी टक्के लेव्ही होती व फक्त वीस टक्के साखर खुल्या बाजारात विकली जात होती. तरीसुद्धा सभासदांना विक्रमी भाव मिळालेले आहेत, असेही जाचक यांनी नमूद केले आहे.
------------------------