पुणे: एका टोळक्याने निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला धारदार हत्याराने मारहाण करीत घरात शिरुन तोडफोड केली. त्यानंतर परिसरात तलवार नाचवत दहशत माजविण्याचा प्रकार घडला.
याप्रकरणी निवृत्त पोलीस अधिकारी गोरखनाथ एकनाथ शिर्के (वय ६५, रा. फॉरेस्ट पार्क, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फॉरेस्ट पार्कमध्ये रविवारी दुपारी दीड वाजता घडला.
गोरखनाथ शिर्के हे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक असून, त्यांनी बंडगार्डन, चतु:श्रृंगीसह विविध पोलीस ठाण्यात काम केले आहे. निवृत्तीनंतर त्यांनी फॉरेस्ट पार्कमध्ये घर बांधले आहे. दरम्यान, आरोपीकडे हाऊसकिपिंगचे कंत्राट आहे. फॉरेस्ट पार्कमध्ये सार्वजनिक रोडवरील ड्रेनेजचे झाकण तुटलेले होते. शिर्के यांच्याकडे येणाऱ्या वाहनांमुळे ते तुटले असा आरोपीने आरोप केला. त्याच वादातून मुख्य आरोपीने साथीदारांच्या मदतीने त्यांना मारहाण केली. त्यानंतर तलवार हवेत फिरवून दहशत निर्माण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. घराच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या खुर्च्या व कुंड्यांची तोडफोड केली. विमानतळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करीत आहेत.