पुणे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या निवडणुकीत सोमवारी पुन्हा नाट्यमय घडामोडी घडल्या. अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत काँग्रेसचे अंकिता पाटील आणि दत्ता झुरंगे निवडणुकीतून माघार घेण्यास तयार नसल्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर दोघांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे सभागृहापुढे पेच निर्माण झाला. शेवटी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी स्थायी समितीची निवडणूक प्रक्रिया काही काळापुरती तहकूब करत असल्याचे सांगत आचारसंहितेनंतर निवडणूक घेण्यात येईल असे सांगितले. यामुळे पुन्हा काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे स्थायी समितीच्या निवडणुकीचे भिजत घोंगडे पुन्हा कायम राहिले.जिल्हा परिषदेची २२ ऑगस्टची तहकूब झालेली सभा सोमवारी (दि. ९) घेण्यात आली. सुरुवातीला विषयपत्रिकेचे विषय चर्चेला घेण्यात आले. यानंतर गेल्या सभेतील स्थायी समितीच्या निवडणुकीचा विषय घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी दोघांचेही अर्ज वैध असल्याचे सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेची परंपरा अबाधित राहावी यासाठी दोघांपैकी कुणीतरी माघाार घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. यासाठी काँगे्रसच्या गटनेत्यांनी तोडगा काढावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी सांगितले. यासाठी महादेव घुले यांनी दोघांनाही माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी दिला. दरम्यान, दत्ता झुरंगे यांनी माघार घ्यावी आणि निसर्गनियमानुसार अंकिता पाटील यांना संधी द्यावी, अशी सभागृहाची मानसिकता होती. यासाठी झुरंगे यांची मनवळवणी करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या काही सदस्यांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, १५ मिनिटांचा कालावधी उलटूनही कुणीच माघार घेतली नाही. यामुळे अध्यक्षांनी पुन्हा १५ मिनिटांचा कालावधी वाढविला. तरीसुद्धा माघार घेण्यास कुणी तयार नसल्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा आग्रह सदस्यांनी केला. यावर अध्यक्षांनी झुरंगे यांची माघार घेण्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी झुरंगे यांनी सभागृहात येत, मी काँग्रेसमधील एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य झालो आहे. मी काँग्रेसचा तळागाळातील कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या निर्णयानुसारच मी निवडणुकीत उभा राहिलो आहे. मला राजकीय वरदहस्त नसल्याने घराणेशाही टाळत मला उमेदवारी मिळावी यासाठी सभागृहानेच मला न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी सभागृहाला केले. यानंतरही झुरंगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ते माघार घेण्यास तयार नसल्याने शेवटी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तोडगा निघत नसल्याने अखेर अंकिता पाटील यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. तसे पत्र त्यांनी अध्यक्षांना दिले. त्या म्हणाल्या, माझ्या आजीच्या जागेवर मी निवडून आले. मी सर्वात लहान सदस्य आहे. तसेच या माध्यमातून मला तरुण मुलींचे आणि महिलांचे प्रश्न मांडायचे होते. पण, माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीलाच राजकारण होत असल्याने मला याचे दु:ख होत आहे. यामुळे मी निवडणुकीतून माघार घेत आहे. या वेळी सभागृहातील सदस्यांनी पाटील यांना माघार घेऊ नका, असे सांगत झुरंगे यांना पुन्हा विनंती केली. मात्र, अंकिता यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. यानंतर झुरंगे यांनीही निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्र दिले. या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे तसेच निवडणूक लढविण्यास एन वेळेला दोघांनीही नकार दिल्याने विश्वास देवकाते यांनी निवडणूक तहकूब करत असल्याचे सांगत आचारसंहिता झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया राबविणार असल्याचे सांगितले. यामुळे स्थायी समितीची जागा पुन्हा राजकीय नाट्यामुळे रिक्त राहिली. अंकिता पाटील यांना राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचा पाठिंबा स्थायीच्या निवडणुकीतून कुणीच माघार घेत नसल्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे ठरले. या वेळी काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याचे दिसले. निवडणूक झाल्यास अंकिता पाटील यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनचे सदस्य मतदान करण्याच्या तयारीत होते. .....काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा झुरंगे यांना पाठिंबाजिल्हा परिषदेत स्थायी समितीतील काँगे्रसच्याच दोन सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय पेच निर्माण झाला होता. यामुळे सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली होती. मात्र, सोमवारी हा पेच कायम राहिला. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांंच्याशी संपर्क साधला असता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असल्याचे सांगितले. यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत माघारनाट्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 3:38 PM
पुन्हा काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे स्थायी समितीच्या निवडणुकीचे भिजत घोंगडे पुन्हा कायम राहिले...
ठळक मुद्देकाँग्रेसच्या दोन्ही सदस्यांनी माघार घेतल्याने निवडणूक तहकूब आचारसंहितेनंतर निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा निर्णयकाँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा झुरंगे यांना पाठिंबा