जेजुरी: संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पहाटे सहा वाजता जेजुरीत आगमन झाले. राष्ट्रीय संत काशिनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्ट,पेशवे परिवार,व ग्रामस्थांच्या वतीने या सोहळ्याचे स्वागत केले.
वाल्हे येथील मुक्काम उरकून रविवार दि ९ रोजी पहाटे सहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत संताजी महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे व वारकरी बांधवांचे विठ्ठल मंदिरात आगमन झाले. संत काशिनाथ महाराज ट्रस्टचे हभप सयाजी मोहरकर व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांवर अभिषेक महापूजा घालण्यात आली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख, विणेकरी व वारकरी उपस्थित होते. उद्योजक सुनील रुकारी, कै पांडुरंग तरवडे परिवार, खुडे व बोधले परिवाराच्या वतीने वारकरी बांधवाना अन्नदान करण्यात आले. हजारो भाविकांनी रांगा लावून माउलींचे दर्शन घेतले.
संत सोपानकाका पालखी सोहळयाचे सकाळी जेजुरीत आगमन झाले. जेजुरी येथील श्री खंडोबा देवाचे मानकरी इनामदार शामराव पेशवे,सचिन पेशवे व ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. पेशवे यांच्या निवासस्थानी संत सोपानकाकांच्या पादुकांची महापूजा ,अभिषेक झाला. यावेळी या सोहळ्याचे प्रमुख गोपाळ गोसावी,श्रीकांत गोसावी व वारकरी बांधव उपस्थित होते. दुपारच्या विसाव्या नंतर तिन्ही पालखी सोहळे सासवड कडे मार्गस्थ झाले.