पुणे: केंद्रातील व राज्यातीलही सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्याच आशिवार्दाने सत्तेवर आले. त्यांनी दिलेल्या रयतेचे राज्य या मुलमंत्रानुसारच राज्यकारभार केला. आता छत्रपतींच्याच आशिवार्दाने पुन्हा सत्तेवर येऊ असा ठाम विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे लोकसभा निवडणुकीचे रणशिंगच मंगळवारी फुंकले.कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी महेश विद्यालय येथे आयोजित केलेल्या सरकारी योजनांची माहिती देणाऱ्या महा-योजना शिबिराचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी झाले. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, सरकारी योजनांचा लाभ लवकर मिळत नाही असा समज होता. ज्यांच्यासाठी योजना आहेत, त्यांच्यापर्यंत त्या पोहचतच नाही अशी स्थिती होती. आम्ही त्यात बदल केला. माहिती शिबिरे, समाधान शिबिरे आयोजित केली. हे शिबिर त्यापैकीच एक आहे. शिवाजी महाराजांनी राज्यकर्त्यांना राज्य रयतेचे आहे हा मुलमंत्र दिला. त्याचेच पालन केंद्र व राज्य सरकार करत आहे. वंचित, गरीबांना लाभ देणे हे सरकारचे काम आहे. त्यादृष्टिने समाजातील सर्व थरातील घटकांसाठी विविध योजना आणल्या, फक्त आणल्यात नाहीत तर त्या संबधितांपर्यंत कशा पोहचतील याची काळजी घेतली. भौतिक विकासाकडेही सरकारचे लक्ष आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, १५ वर्ष पुण्यात ज्या योजनांची फक्त चर्चाच सुरू होती, त्या योजना आम्ही प्रत्यक्षात आणल्या, त्यांच्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले, काम सुरू झाले. सन २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर अशी योजना आहे. राज्यात सन २०२१ मध्येच ही योजना पुर्ण होईल असे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यासाठी अनेक योजना दिल्या आहेत. पुणे हे उत्तम शहर आहेच, ते सर्वोत्तम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या काही वर्षातच पुण्याचा नवा चेहरा पहायला मिळेल.मुख्यमंत्र्यांना पुढील कार्यक्रमाची घाई असल्यामुळे अन्य कोणाचेही भाषण घेण्यात आले नाही. आमदार कुलकर्णी यांनी प्रास्तविकात शिबिराची माहिती दिली. लाभार्थी घटकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनेक लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती. मात्र ते लगेच निघून गेल्यामुळे त्यांची निराशा झाली.
................
राज्य राखीव दलातून अपात्र म्हणून कमी केलेल्या अपर्णा धारिया यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन द्यायचे होते. त्यामुळे त्यांना पोलिसांचे कडे भेदून व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यामुळे त्या भयंकर संतप्त झाल्या होत्या. अन्याय निवारण व्हावे यासाठी तक्रार करण्याचाही आम्हाला अधिकार नाही का अशी विचारणा करत त्यांनी माध्यमांसमोर गाऱ्हाणे गायले.