लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये नवीन अर्ज करण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना दि.७ जुलैपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहेत. रिक्त राहिलेल्या सुमारे साडेपाच हजार जागांसाठी दि.२७ जून पासून पुन्हा आॅनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. जिल्ह्यातील ८४९ खासगी विनाअनुदानित शाळांसाठी २५ टक्के आरक्षणाअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. अद्यापही ५ हजार ४९५ जागांवर प्रवेश झालेले नाहीत, तर तब्बल १३८ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही. यापार्श्वभूमीवर रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने दुसऱ्यांदा आॅनलाइन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. २७ जून ते ४ जुलै या कालावधीत नवीन अर्ज, तसेच आधीच्या अर्जामध्ये बदल करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत तीन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. ‘सुरुवातीचे दोन-तीन दिवस काही तांत्रिक कारणांमुळे अर्ज भरणे किंवा सुधारणा करण्यात अडथळे आले होते. आता ही प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत दि. ७ जुलैपर्यंत वाढविण्यात निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मुश्ताक शेख यांनी दिली.
आरटीई प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ
By admin | Published: July 05, 2017 3:43 AM