राजगुरुनगर: साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. मुलाला जबड्यात धरून पळून जात असताना गावकऱ्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने मुलाला सोडून तिथून धूम ठोकली. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील रेटवडी -जरेवस्ती येथे शुक्रवारी रात्री ( दि .३१ )साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. साईश दत्तात्रय पवळे हा साडेतीन वर्षाचा मुलगा हा रात्री घराबाहेर खेळत होता. तसेच घरातील मंडळी अंगणात जेवण करित असताना अचानक बिबट्याने अंगणात येऊन चिमुकल्याची मान पकडली. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने चिमुकल्याला सोडून धूम ठोकली.
या हल्ल्यात चिमुकला रक्तबंबाळ झाला. या बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या साईशच्या मानेला बावीस टाके पडले असून पाठीला पंज्याने ओरखडले आहे. साईशची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. हर्षद गावडे यांनी सांगितले. लहान मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्या कधी येईल आणि कधीही हल्ला करेल याचा नेम नसल्याचे माजी सरपंच दिलिप पवळे यांनी सांगितले. बिबट्याला पकडण्याची वनविभागाने या परिसरात पिंजरे लावले आहे.