राजेगाव : दौंड तालुक्यात फायबर बोटीने तसेच सेक्शन बोटीवर महसूल विभागाने कारवाई करत वाळूमाफियांना दणका दिला आहे. खेड (ता. कर्जत) येथे ५ फायबर बोटी आणि १ सेक्शन बोट तर वाटलूज येथे (ता. दौंड) ३ फायबर बोटी आणि २ सेक्शन बोटी, तर भांबोरा (ता. कर्जत) येथे २ फायबर बोटी आणि १ सेक्शन बोट अशा १४ बोटी जिलेटीनच्या साह्याने उद्धवस्त केल्या आहेत. या कारवाईत वाळूमाफियांचे मोठे नुकसान झाले आहे.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागात अनेक दिवसांपासून नदीपात्रात बेकायदेशीर वाळूउपसा सुरू होता. या बाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. यामुळे दाैंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी गुरुवारी (दि.११) येथील नदीपात्रात आपले सहकारी तलाठी, मंडल अधिकारी यांना घेऊन वाळूउपसा करणाऱ्या वाळूचोरांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत १४ बोटींना जलसमाधी देण्यात आली. दौंड तालुक्याच्या पूर्व भगातील ही सर्वात मोठी कार्यवाही समजली जात आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे कंबरडे मोडले आहे. भीमा नदीतील या काळ्या सोन्याचे तरुणांमध्ये दिवसेंदिवस आकर्षण वाढत आहे. कमी कष्टात जास्त पैसे मिळण्याच्या अपेक्षेने अनेक तरुण या अवैध धंद्याकडे वळत आहे. त्यातून गुंडगिरी, दमदाटी आणि मारामारी असे प्रकार करायलाही तरुण मागेपुढे पहात नाहीत.
या कार्यवाहीमुळे सामान्य नागरिकांमध्ये मात्र समाधान व्यक्त होत आहे.
या कार्यवाही मध्ये तहसीलदार संजय पाटील, मंडल अधिकारी मंगेश नेवसे, तलाठी शशिकांत सोनवणे, दीपक पांढरपट्टे, दीपक आजबे, संतोष इडुळे, हरिश्चंद्र फरांदे, बालाजी जाधव, मनोज तेलंग यानी सहभाग घेतला होता.
या वाळूतस्कररांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, असे केले तरच वाळूचोरीला मोठा आळा बसेल असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
छाया : भीमा नदी पात्रात जिलेटीनच्या साह्याने उद्धवस्त करण्यात आलेली वाळूची बोट
Attachments area