लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यातील गेल्या दोन महिन्यांपासून महसुली दाव्यांच्या सुनावण्या ठप्प होत्या.
अखेर या दाव्यांच्या सुनावण्या शुक्रवार (दि.५) पासून सुरू होणार आहेत. यामध्ये दोन्ही दाव्या कर्त्यांनी लेखी मागणी केल्यास केस बंद करून अंतिम निकाल देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच प्रलंबित आहेत. दरम्यान, महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात जमिनीसंदर्भातील दावे आणि प्रतिदावे यांवर सुनावणी घेतल्या जातात. एप्रिल महिन्यापासून या सुनावण्या स्थगित असल्याने नागरिकांची अडचण झाली होती. या सुनावण्या ऑनलाइन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणी आल्याने त्या बंद करण्यात आल्या. यापूर्वी दररोज सरासरी १०० ते १२० सुनावण्या घेण्यात येत होत्या. सद्य:स्थितीत दररोजच्या सुनावण्यांची संख्या कमी असणार आहे.
याबाबत देशमुख यांनी सांगितले, पक्षकार आणि वकील यांना सुनावणीची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. सुनावणी कक्षामध्ये केवळ पक्षकारांच्या वकिलांनाच उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तसेच दिवसाला केवळ एकच स्टेची केस चालविण्यात येणार असल्याचे सांगितले.