पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात पालिकेला आर्थिक फटका बसला. उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाल्याने उत्पन्न घटले आहे. वर्षभरात थोपवून धरलेल्या विकासकामांना प्रशासनाने मान्यता दिली आहे. तब्बल एक हजार कोटीची विकासकामे मंजूर झाल्याने मार्च अखेरीस पालिकेचे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी अवस्था होण्याची शक्यता आहे. पालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३ हजार ७०० कोटी रुपये जमा झाले असून यातील साडेतीन हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.
कोरोना काळात पालिकेला मिळकत कर विभागाने समाधानकारक उत्पन्न मिळवून दिले. राज्यशासनाकडून देण्यात येणा-या एलबीटी अनुदानाचाही आधार मिळाला. मात्र, बांधकाम विकसन शुल्काद्वारे मिळणारे उत्पन्न कमी झाले. अन्य उत्पन्नाचे स्त्रोतही घटले. कोरोना नियंत्रण, मागील वर्षांची जवळपास सातशें कोटींची नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय कामांची बिले, मोठया योजनांचा खर्च यासाठी सुमारे ३५०० कोटींचा खर्च झाला आहे. मात्र, त्याच वेळी प्रशासनाने गेल्या आठ महिन्यांपासून थपवून धरलेल्या नगरसेवकांच्या ७०० ते ८०० कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ही बिले प्रशासनास या वर्षी मार्च अखेरीस द्यावी लागणार आहेत. मात्र, मार्च अखेरपर्यंत आणखी ५०० ते ६०० कोटींचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी अवस्था होण्याची भीती आहे.