पुणे : केंद्र सरकारने ५०० आणि १००० च्या चलनी नोटांवर बंदी आणल्यामुळे भ्रष्टाचारी व्यापारी, व्यावसायिक, राजकारण्यांसह शासकीय अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटांवरील बंदीची घोषणा करताच पुण्यातील महसूल, महापालिका आणि पोलीस विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. आपापल्या विश्वासू कनिष्ठ कर्मचाऱ्यांमार्फत या अधिकाऱ्यांनी हप्तेखोरीमधून जमवलेले तसेच बगलेत दाबून ठेवलेले कोट्यवधी रुपये बाहेर काढले. या पैशांमधून अत्यंत गुप्तता राखत सोने खरेदी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तीन शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या सोन्याचा आकडा अंदाजे ३० कोटींच्या घरात असल्याची चर्चा आहे.मोठ्या चलनी नोटा व्यवहारामधून बाद झाल्याची घोषणा होताच काळ्यापैसेवाल्यांची धावाधाव उडाली. याला भ्रष्ट शासकीय अधिकारीही अपवाद राहिले नाहीत. रात्रीमधूनच आपल्याकडील काळ्या पैशांची तजवीज कशी लावायची, असा प्रश्न सर्वांना पडला होता. काही अधिकाऱ्यांनी तातडीने स्वत:च्या विश्वासू कर्मचाऱ्यांना बोलावून घेत सोने खरेदीचा ‘आॅप्शन’ दिला. पडत्या फळाची आज्ञा मानून कामाला लागलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या धन्यासाठी मंगळवारी रात्री आणि बुधवारी दिवसभरामध्ये ‘चढ्या भावाने’ सोने खरेदी केले. शहरातील विविध सराफी पेढ्यांमधून सोन्याची बिस्कीटे खरेदी करण्याचे प्रमाण दिवसभरामध्ये वाढले होते. शहरामध्ये पेट्रोलपंप आणि सराफी बाजार प्रचंड तेजीमध्ये होता. काही अधिकाऱ्यांनी आपले ‘वजन’ वापरत नोटा बदलून घेतल्या. नोटा बदलून देण्याचा व्यवसाय असलेल्या काही व्यापाऱ्यांची मात्र चांगलीच चंगळ झाली. काही ठराविक टक्केवारी देऊन या नोटा बदलून दिल्या जात होत्या. व्यापारी पेठांमधले मोठे व्यवहार आज ठप्प असल्यामुळे एकच धावपळ उडाली होती.
महसूल, महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांची धावाधाव!
By admin | Published: November 10, 2016 2:22 AM