पिंपरी : कपाळी अबिराची टिळा, पांढरा कुर्ता, पायजमा असा साधा पेहराव, तोंडावरची माशीही उठणार नाही अशी नेमस्थ देहबोली. मात्र ‘सरकार’ दरबारी भारी वजन. कोणतेही काम फटक्यात करून देण्यात तरबेज. नाव माऊली. कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या फाजील प्रोत्साहनामुळे साध्याभोळ्या माऊलीचे दोन - चार वर्षांतच महसूल विभागातील फायली सरकवणाऱ्या पट्टीच्या दलालात रूपांतर झाले आहे. त्याच्या प्रतापाने अनेकांचा जीव टांगणीला लागण्याची वेळ आली आहे. याचप्रमाणे महसूल विभागाशी थेट संबंध नसतानाही बेधडक कोणत्याही फायली हाताळण्याची मुभा मिळालेल्या दलालांचा पिंपरी - चिंचवड व परिसरात सुळसुळाट झाला आहे. अशा माऊलींमुळे शहरवासीयांना नाडले जात असून, त्यांचा बंदोबस्त कोण करणार, असा प्रश्न आहे. तलाठी कार्यालयापासून तालुक्याच्या तहसील कचेरीतील कोणतेही काम करून घ्यायचे झाल्यास माऊलीला पर्याय नसल्याची भावना निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)
महसूलचे पान दलालांविना हलेना
By admin | Published: November 17, 2014 4:54 AM