पुणे : नगर रस्ता बीआरटीबाबत तातडीच्या तीन ते चार उपाययोजना करण्याबाबत पीएमपीची प्रमुख मागणी असून, या मागण्या तीन दिवसांत पूर्ण करता येणार आहेत. त्यामुळे या सुधारणा झाल्यानंतर येत्या २४ मे रोजी पुन्हा आढावा बैठक घेऊन त्यानंतरच नगर रस्ता बीआरटी मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी लोकमतशी बोलताना दिली. पीएमपी प्रशासनाकडून हा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची मागणी करण्यात आली असली, तरी आढावा बैठकीनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगर रस्ता बीआरटी सुरू करण्यात आल्यापासून गेल्या २० दिवसांत या मार्गावर १५हून अधिक लहान-मोठे अपघात झाले असून, एका ज्येष्ठ नागरिकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यातच ही अपघातांची मालिका सुरूच आहे. (प्रतिनिधी)
आढावा घेऊनच बीआरटीबाबत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2016 12:36 AM