पुणे : न झालेल्या कामांचा आणि तातडीने करावयाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पुणे कँटोन्मेंट प्रशासनाने दर दोन महिन्यांनी आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णय झालेल्या कामांची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ मध्यंतरी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या वेळी सर्वच सदस्यांनी सभात्याग केला होता. त्या पार्श्वभूमीवर एक बैठक घेण्यात आली. त्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.एन. यादव यांनी मोठ्या योजनांना मंजुरी दिल्यानंतर त्यांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल अप्रत्यक्ष कबुली दिली आणि कामांच्या आढाव्यासाठी दर दोन महिन्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, अतुल गायकवाड, विवेक यादव, विनोद मथुरावाला आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ब्रिगेडीयर ए.के. त्यागी होते.डॉ. किरण मंत्री, रूपाली बीडकर, प्रियंका श्रीगिरी या महिला सदस्यांनी महिलांसाठी बोर्डाची कसलीही योजना नसल्याचे निदर्शनास आणून देत विधवांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी केली. त्यावर केंद्र सरकारप्रमाणे कँटोन्मेंट परिसरात विधवा पेन्शन योजना सुरु केली जाईल, असे आश्वासन त्यागी यांनी दिले.मथुरावाला यांनी आरोग्य विभागाचे कर्मचारी वेळेवर काम करत नसल्याने नागरिकांच्या अनेक तक्रारी असल्याचे सांगितले. गिरमकर, यादव, गायकवाड यांनीही हलगर्जीपणामुळे कँटोन्मेंट परिसरात घाण आणि अतिक्रमण यांचे साम्राज्य असल्याचा आरोप केला. (प्रतिनिधी)
कँटोन्मेंटची दर दोन महिन्यांनी आढावा बैठक
By admin | Published: December 26, 2016 3:56 AM