पुणे : रिव्ह्यू द्या, रेटिंग द्या, गुंतवणूक करा त्यातून चांगला पैसे मिळेल असे आमिष दाखवून पुण्यातील दोघा महिलांची फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ३०) एकाच दिवसात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये याबाबतच्या फिर्याद दाखल केल्या आहेत.
पहिल्या घटनेत कोंढवा परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने फिर्यादी दिली आहे. त्यानुसार त्यांना आह्मी रावल नामक महिलेचा पार्टटाइम नोकरी करण्यासाठी व्हाॅट्सॲपवर मेसेज आला. पार्टटाइम नोकरीसाठी सहमत असल्याचे सांगितल्यावर त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. वेगवेगळे गुगल पेजेस रिव्ह्यू केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन विश्वास संपादन केला. वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार यांच्याकडून ५ लाख ३५ हजार रुपये भरण्यास भाग पडले. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भोसले पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेमध्ये चंदननगर परिसरात राहणाऱ्या एका ३६ वर्षीय मॅनेजर महिलेने फिर्याद दिली आहे. पार्टटाइम रेटिंग देण्याचे काम आहे. तसेच गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला देऊ असे सांगून महिलेला विश्वासात घेतले. ४ लाख ६ हजारांची गुंतवणूक केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड पुढील तपास करत आहेत.