लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आघाडीच्या सत्ताकाळात पक्षाच्या योजनांच्या प्रसारासाठी स्थापन केलेल्या राज्य संनियंत्रण समिती काँग्रेस पुन्हा सक्रिय करत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत यासाठी राज्यातील समितीच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पुण्यात २३ जुलैला होत आहे.
केंद्र सरकारच्या विविध क्षेत्रांतील अपयशाची, चुकीच्या निर्णयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवून काँग्रेसची राजकीय ताकद वाढवण्याची नवी जबाबदारी या समितीवर आता सोपवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात ही समिती स्थापन झाली होती. सन २०१४ ला युतीची सत्ता आली व त्यानंतर समिती अस्तित्वहीन झाली. सध्याचे प्रदेश पदाधिकारी विनायक देशमुख समितीचे अध्यक्ष होते. त्यांनीच प्रदेशाध्यक्ष पटोले यांना समिती पुन्हा सक्रिय करण्याची कल्पना सांगितली. जिल्हानिहाय पदाधिकारी अजून पक्षात राहून काम करत असल्याचे सांगितले. पटोले यांनी त्याला लगेच मान्यता देत समितीला नवी जबाबदारी देऊ, असे सांगितले.
त्यासाठीच पुण्यात मुकुंदनगर येथे २३ जुलैला (शुक्रवारी) समितीच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची दिवसभराची बैठक होत आहे. पटोले स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार असून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. प्रामुख्याने मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळाबरोबर मोदी सरकारची तुलना करणे, भाजपाच्या धार्मिक, जातीय विचारधारेचा देशाला असलेला धोका जनतेच्या निदर्शनास आणणे, काँग्रेसची राजकीय ताकद तयार करणे या प्रकारची जबाबदारी या संनियंत्रण समितीवर सोपवण्याचा विचार आहे असे समजते.