राजगुरुनगर व चाकण शहरातील मुद्रांकविक्रेते स्टॅम्पपेपरचा काळाबाजार करून १०० रुपयांचा स्टॅम्प १५० रुपयांना व ५०० रुपयांचा स्टॅम्प सातशे रुपयाला नागरिकांना विक्री करत आहेत. चाकण येथील परवानाधारक मुद्रांकविक्रेते राजगुरुनगर येथे काळ्या बाजाराने विक्री करत आहेत. यावर प्रशासनाचा जरब राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. काही स्टॅम्प विक्रेते तर जुन्या तारखेचे स्टॅम्प ठोक रकमेने विकतात. शासनाची व नागरिकांची आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे गैरव्यवहार, गैरकारभार करण्यास मुद्रांकविक्रेते एकप्रकारे प्रोत्साहन देत आहे. खासगी टायपिंगच्या दुकानात मुद्रांकविक्रेता नसताना त्रयस्थ व्यक्तीद्वारे जादा पैसे घेऊन स्टॅम्पपेपर दिले जात आहे. काही मुद्रांकविक्रेते एकाच वेळी चाकण व राजगुरुनगर शहरात मुद्रांक विक्री करत आहे. तसेच स्टॅम्प पेपरचा भरपूर साठा असताना ही शिल्लक नाही. असे भासवून जादा पैसे घेऊन नागरिकांना देत आहे. सध्या मार्चअखेरीनंतर आमचे लायसन्स रिनिव्हलसाठी गेले आहे, असे सांगून स्टॅम्प शिल्लक असतानाही नागरिकांना दिले जात नाहीत. प्रशासनाने या सर्व प्रकारची चौकशी करून जे मुद्रांकधारक गैरव्यवहार करीत आहे त्यांचे परवाने रद्द करावेत. तसेच ज्या परवाना धारकावर यापूर्वी तक्रारी असूनही कोणतही कारवाई झाली नाही. अशा परवानाधारकांवर कारवाई करावी. अन्यथा, खेड तालुका भीमशक्ती संघटनेच्या वतीने खेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा विजय डोळस यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
जादा दर घेणाऱ्या मुद्रांकाविक्रेत्यांचे परवाने रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:09 AM