पुणे : भोर वेल्हा मुळशी मतदारसंघात पुणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी आज गुरुवारी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.
महायुतीत ही जागा शिवसेनेकडे गेली आहे. काँग्रेसकडून संग्राम थोपटे व शिवसेनेकडून कुलदीप कोंडे रिंगणात आहेत. ही जागा भाजपला मिळावी म्हणून प्रयत्न केले गेले होते . भोर विधानसभेच्या पुनर्रचनेनंतर 2009 पासून संग्राम थोपटे हे कॉंग्रेसच्या तिकिटावर दोनदा निवडून आले आहेत. त्यांचे भाेर नगरपरिषद व वेल्हे पंचायत समिती यावर वर्चस्व आहे. आता त्यांना दगडे पाटील कशी लढत देतात बघणे औसुक्याचे ठरणार आहे. कुलदीप कोंडे हे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. सन 2014 मध्येही ते भोर विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर लढले होते. संग्राम थोपटे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. यंदाही शिवसेनेने त्यांना संधी देऊन निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे.
मुळशीवर आधारित मुळशी पॅटर्न चित्रपटाची निर्मिती दगडे यांनी केली आहे. त्यांच्या पत्नी पियुषा या बावधन गावाच्या सरपंच आहेत. शिवाय या मतदारसंघातील अनेक रहिवासी हे कोथरूड बावधनमध्ये वास्तव्यास आहेत, त्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे दगडे यांच्या उमेदवारीने या जागेवरील लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.