आसाममधील गुवाहाटीच्या जवळील मेघालयातील डोंगररांगांमध्ये खासी आणि जयंतीया या वंशाच्या आदिवासींची छोटी - छोटी राज्ये होती. त्यातील नोंगखालो राज्याचा उ-हेन-सिंग या राजाच्या मृत्यूनंतर तिरथसिंह या दहा वर्षांच्या मुलाची निवड राजा म्हणून झाली. लहान वयामुळे आई काक्सान राज्य चालवू लागली. तिरथसिंह या नावाचा उल्लेख उ. तिरोत सिंग असाही केला जातो. १८२७ च्या सुमारास इंग्रजांचे लक्ष आसाम, मेघालय, मणिपूरकडे वळले. १७५७ च्या प्लासी लढाईमुळे बंगाल ताब्यात आला. पूर्वेकडची राज्ये ताब्यात घेतानाच काछार जिंकून सिलचरला आलेल्या इंग्रजांना गुवाहाटीच्या मुख्य विभागाला जोडणारा रस्ता करायचा होता; पण मधल्या डोंगराळ प्रदेशात तिरथसिंहाचे राज्य होते. भूलथापा देत कमांडर स्कॉटने रस्ता बनविण्याची परवानगी मागितली. तरुण तिरथसिंहाने इंग्रजांचा कावा ओळखत ती नाकारली. पण स्कॉटने राजाच्या आईला भेटून परवानगी मिळवत रस्त्याचे काम सुरू केले. प्रदेशातील आदिवासींच्या तक्रारी तिरथसिंहाकडे येऊ लागल्या. इंग्रज रस्त्याच्या नावाखाली प्रदेश ताब्यात घेत खासी लोकांवर जुलूम करत. तिरथसिंहाने ताबडतोब काम थांबवण्याचा हुकूम दिला. त्याला न जुमानता लेफ्टनंट बेंचने खासी पर्वतातील नोग्खालो राज्यावर आक्रमण केले. युद्ध चार वर्षे चालले; पण गनिमी काव्याने तिरथसिंहाच्या सैन्याने इंग्रजांचे मोठे नुकसान केले. राज्य जिंकता न आल्याने इंग्रजांनी प्रजेला भडकावण्याचे प्रयत्न केले. अखेर लोकाग्रहास्तव तिरथसिंह मिल्लोन येथील 'लुम मैडांग' येथे इंग्रजांबरोबर चर्चेला गेला; पण विश्वासघाताने त्यांना कैद करून खटला चालवत आजीवन कारावासासाठी ढाका जेलमध्ये पाठविण्याचे ठरले. मात्र, तिथे एका घरात दोन नोकरांबरोबर नजरकैदेत ठेवलेल्या तिरथसिंह यांचा १८४१ च्या सुमारास नजरकैदेत असतानाच मृत्यू झाला. १८५७ पूर्वी देशात छोटे-मोठे उठाव झाले, त्यात तिरथसिंह यांनी खासी आदिवासींना एकत्र करून दिलेला लढा महत्त्वाचा आहे.
प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:12 AM