पुणे : मुळशी तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक २ मधून उभ्या असलेल्या एका उमेदवाराचे अपहरण करून त्याला रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून अर्ज मागे घ्यायला लावल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार दुपारी ३ च्या सुमारास घडला. संतोष सोपान पारखी (वय ३०, रा. गंगारामवाडी, माणगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. संदीप साठे, रोशन ओझरकर, आकाश भोईर, विकास गायकवाड, सागर मोरे यांनी रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. संतोष पारखी हे वॉर्ड क्रमांक २ मधून निवडणूक लढवीत आहेत, त्यांच्याविरुद्ध संदीप साठे, छाया पारखी, प्रीती पारखी हे निवडणूक लढवीत आहेत. संतोष पारखी यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून संदीप साठे त्यांच्यावर दबाव टाकत होते. गुरुवारी दुपारी संतोष हे चाळीजवळ थांबले असताना एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून संदीप साठे व त्याचे साथीदार आले. त्यांनी रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून पारखी यांना मोटारीत बसायला लावले. त्यानंतर पौड येथील कार्यालयामध्ये ते त्यांना घेऊन गेले, तिथे जिवे मारण्याची धमकी देऊन अर्ज मागे घेण्याच्या फॉर्मवर सही करायला लावली. त्यानंतर दुपारी सव्वाचारच्या सुमारास त्यांना वाटेत मध्येच सोडून ते निघून गेले.
अर्ज मागे घेण्यासाठी रोखले रिव्हॉल्व्हर
By admin | Published: July 24, 2015 4:15 AM