पौड - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील वनस्पतिशात्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. राणी भगत यांनी लिहिलेल्या ‘फ्लोरिस्टिक डायव्हर्सिटी आॅफ मुळशी, नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.बडोदा येथे झालेल्या इंडियन असोसिएशन फॉर अॅबन्जीओस्पर्म टॅक्झॉनॉमी या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या (वडोदरा, गुजरात) कुलगुरू शुभांगिनीराजे गायकवाड आणि उपकुलगुरू परिमल व्यास यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन झाले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेत डॉ. भगत यांना एम. साबू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला नेदरलँड्स येथील शास्त्रज्ञ डॉ. पॅट्रिक बास, आयएएटीचे अध्यक्ष डॉ. ए. जी. पांडुरंगन, सचिव प्रा. एम. साबू, वनस्पतिशात्र विभागप्रमुख संध्याराणी तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. विनय रावले उपस्थित होते.सदर पुस्तकात मुळशी तालुक्यात आढळणाऱ्या १,५५१ वनस्पतींच्या प्रजातींची यादी, ५०० वनस्पतींच्या रंगीत छायाचित्रांसह माहिती देण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त मुळशीत आढळणारी धरणे, किल्ले व ७० देवरायांची माहितीही देण्यात आलेली असून, अतिदुर्मिळ वनस्पतींची यादीही त्यात समाविष्ट केलेली आहे. या पुस्तकासाठी त्यांना नवी दिल्ली येथील सायन्स अँड इंजिनिअरिंग रीसर्च बोर्डाचे आर्थिक पाठबळ लाभले होते. हे काम त्यांनी पिरंगुट (ता. मुळशी) येथील अनंतराव पवार महाविद्यालयात पूर्ण केले.
मुळशी जैवविविधतेबाबत शोधनिबंधाला पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 12:51 AM