"गुन्हेगार सापडत नसतील तरच बक्षीस! नवीन पायंडे पाडू नका", पुणे पोलिसांच्या त्या निर्णयावर अजित पवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 12:14 PM2023-02-02T12:14:46+5:302023-02-02T12:14:57+5:30
पुणे पोलिसांवर राष्ट्रवादी नेते अजित पवारांची टीका...
पुणे /किरण शिंदे : एखादा गुंड अजिबातच सापडत नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते तेव्हा अशा प्रकारचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नये असे सांगत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणेपोलिसांच्या त्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
गुन्हेगाराला पकडणाऱ्या पोलिसांना बक्षीस देण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला होता. फरार असणाऱ्या, पाहिजे असणाऱ्या, शस्त्र बाळगणाऱ्या आणि सराईत गुंडांना पकडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाच ते दहा हजार रुपये बक्षीस देण्याचे पुणे पोलिसांनी जाहीर केले होते. या निर्णयावर अजित पवारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, एखादा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती अजिबातच सापडत नसेल तेव्हा त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केलं जातं. मात्र सरसकट बक्षीस जाहीर होत असेल तर पोलीस यंत्रणे पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. कायदा सुव्यवस्था राखणे आणि महिलांवर अत्याचार न होऊ देणे हे पोलिस यंत्रणेचे काम आहे. मात्र या कामासाठी त्यांना आमिष दाखवलं जात असेल तर हे योग्य नाही.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून, खबऱ्याच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. नवीन पांडे पाडण्याची गरज नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी बक्षीस देण्याचा निर्णय का घेतला त्याची मी त्यांना विचारणा करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले