पुणे : पुणे शहर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी असून आज संध्याकाळी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आणि भाजप आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. खासदार गिरीश बापट यांना सर्वाधिक मतदान दिलेल्या वडगाव शेरी मतदारसंघाचे नेतृत्व त्यांच्याकडे असल्याने त्यांना या अंकांची बक्षिसी मिळाल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 'सहाच महिन्यांपूर्वी आमदार माधुरी मिसाळ यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यापूर्वी शहराध्यक्ष असणारे योगेश गोगावले यांना प्रदेश कार्यकारिणीत घेण्यात आले आहे.मिसाळ यांच्याकडे असणारी पर्वती विधानसभेची आमदारपदाची जबाबदारी बघता त्यांच्याऐवजी मुळीक यांची निवड करण्यात आली आहे'.
कोण आहेत जगदीश मुळीक, घ्या जाणून :
- वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार (२०१४ ते २०१९ )
- २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांच्याकडून पराभूत
- शांत, संयमी, सुसंस्कृत म्हणून पक्षात ओळख
- भाऊ योगेश मुळीक पुणे महापालिकेत नगरसेवक
जगदीश मुळीक यांच्या निवडीचे पक्षाला होणारे फायदे :
- तरुण असल्याने नवमतदार आणि तरुणांशी थेट कनेक्ट होता येणार
- पक्षाच्या अंतर्गत गटबाजीत नसल्याने काम करणे सोपे होणार
- विधानसभेच्या कामकाजाची माहिती
जगदीश मुळीक यांच्यासमोरची आव्हाने :
- पक्षाची अंतर्गत गटबाजी मोडून संघटना अधिक मजबूत करणे
- आक्रमतेचा अभाव
- वडगाव शेरी वगळता बाकी शहर कार्यकर्त्यांशी संपर्काचा अभाव
- आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटनेची तयारी करणे