भोर : तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताची सुमारे ७५०० हेक्टरवर लागवड करण्यात आली असून, समाधानकारक पडत असलेल्या पावसामुळे भाताचे पीक चांगले आहे. मात्र, कडधान्य पिके पावसामुळे खराब झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था ‘कही खुशी कहीं गम’ अशी झाली आहे.
भोर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ८८५९२ हेक्टर असून, खरीप पिकाखालील १५५ गावांमध्ये २० हजार हेक्टर क्षेत्र आहे. तर रब्बी पिकाखालील गावे ४१ असून, क्षेत्र १७ हजार ४०० हेक्टर आहे. बागायती क्षेत्र ७३३४ हे तर जिरायती क्षेत्र ३० हजार ३०८ हेक्टर असून एकूण लागवडीखालील क्षेत्र ३७ हजार ६४२ इतके आहे. तालुक्यातील प्रमुख पीक भात असून, ५० हेक्टरवर रोपवाटिका तयार करून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. यात इंद्रायणी, बासमती, फुले, समृद्धी, रत्नागिरी २४, कर्जत, आंबेमोहोर, तामसाळ या हळव्या आणि गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जाते.
समाधानकारक पाऊस झाल्याने ५० हेक्टरवर भाताचे बी पेरले होते. वेळेवर पाऊस झाल्याने १०० टक्के भाताची लागवड झाली आहे. भाताचे पीक जोमात आहे. यामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते. मात्र, पुढील काळात भात पोषण्याच्या वेळेत पाऊस आवश्यक आहे. सध्या ग्रामीण भागात लागवड करून बेननी करून खते टाकून झालेली आहेत. भाताला थोड्याफार प्रमाणात उन्हाची गरज आहे.तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा देवघर आणि भाटघर धरणखोºयात डोंगरउतारावर मोठ्या प्रमाणात नाचणी केली जाते. या वर्षी १५०० हेक्टरवर नाचणीची लागवड केली असून, भुईमूग २५०० हे, वरई ६०० हे, मूग ५० हे, सोयाबीन २७५० हे, बाजरी २०० हे, कारळा १०० हे, भाजीपाला ८०० हे, उडीद १०० हे, तूर २०० हे लागवड करण्यात आली आहे. मात्र, संततधार पावसामुळे तालुक्यातील भातपिकानंतर महत्त्वाचे असलेले सोयाबीन पीक खराब झाले आहे. तर भुईमूग, घेवडा, वाटाणा, बाजरी हि पिक खराब झाली असून सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.
तालुक्यातील हिर्डोशी, महुडे, वेळवंड, भुतोंडे, आंबवडे, वीसगाव खोºयात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते. यामुळे या विभागाला भाताचे आगार समजले जाते, तर सध्या कृषी विभागाच्या मदतीने यंत्राद्वारे, हातवे, सणसवाडी, माळेगाव, नाटंबी, महुडे, खानापूर या गावांत रोपवाटिका करून ५० एकरवर भाताची लागवड आधुनिक पद्धतीने केली जात असून, पुढील वर्षी यात अजून वाढ होईल.- सूर्यकांत वडखेलकर,तालुका कृषी अधिकारी