पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची पुणे महापालिकेकडून ‘ऐतिहासिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले असून, महापालिकेच्या हेरिटेज वॉकमध्ये या स्थळाचा समावेश करण्यात आला आहे.
पुण्यात १८९२ मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी तीन गणपती बसविले होते. त्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश होता. महापालिकेच्या वारसा स्थळांच्या यादीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश नव्हता. गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर आता रंगारी गणपतीची ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
शहरातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंची पर्यटकांना पाहणीसाठी करता यावी यासाठी महापालिकेने जो 'हॅरिटेज वॉक' केला आहे, त्यामध्येही रंगारी गणपतीचा समावेश करण्यात आला आहे. या हेरिटेज वॉकमध्ये मध्य पुण्यातील बारा ऐतिहासिक वास्तूंचा समावेश आहे.
रंगारी भवन पर्यटकांचे आकर्षण केंद्र
क्रांतिकारकांचे माहेरघर असलेल्या रंगारी भवनात गुप्त दालन, भुयारी रस्ते, ब्रिटिशकालीन ऐतिहासिक शास्त्रास्त्रे, इस्ट इंडिया कंपनीची पेटी व वाड्याला सेंट्रल लॉकिंग सिस्टीम असून, विश्वस्त पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पुनीत बालन यांनी 'इंद्राणी बालन फाउंडेशन'च्या माध्यमातून रंगारी भवनाचे नूतनीकरण केले. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या पर्यटकांचे हे भवन आकर्षण केंद्र बनले आहे.
एक गणेशभक्त म्हणून मनस्वी आनंद
"देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपतीचे मोठे योगदान आहे. ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीत महापालिकेकडून या गणपतीचा समावेश केला याचा उत्सवप्रमुख आणि एक गणेशभक्त म्हणून मनस्वी आनंद होत आहे." - पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त