पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका गणेशभक्ताने १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या मुकुटांवर विविध प्रकारचे पाचू लावण्यात आले असून रेखीव नक्षीकाम करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपतीला हा मुकुट घालण्यात आला.
मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने निवडक विश्वस्तांच्या उपस्थितीत आणि ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी हा सोहळा साधेपणाने संपन्न झाला. उत्सवकाळात देखील मंदिर बंद राहणार असल्याने कार्यकर्ते मंदिरात दर्शनासाठी जाणार नसल्याचा मोठा निर्णय ट्रस्टतर्फे यंदाही घेण्यात आला आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी आलेल्या भाविकांनी मंदिरावरील आकर्षक विद्युतरोषणाई पाहण्यासोबतच रस्त्यावरुन बाहेरुनच दर्शन घेत कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, अशी श्रीं ची चरणी प्रार्थना केली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सवकाळात गर्दी करु नये व ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.