पुणे : पु.ल. देशपांडे यांची वाचकांच्या मनात विनोदी साहित्यिक अशी प्रतिमा असली तरी ते एक चिंतनशील साहित्यिक होते. पु.ल. एखाद्या समस्येबाबत किती गंभीरपणे विचार करू शकतात याचा प्रत्यय त्यांच्या लिखाणातून येतो. ऑडिओ बुकसाठी वाचन करताना पुन्हा एकदा त्यांचे साहित्य कुतूहलाने वाचले. त्यांची शब्दांची निवड,त्याचा अर्थ,आशय,समजावून घेण्याची प्रक्रिया सुरूच होती. कारण ते सर्व ऐकणा-यापर्यंत पोहचविणे ही जबाबदारी होती.ऑ डिओ बुकसाठी पु.लंच्या पुस्तकाचे वाचन करताना ते परिणामकारक रितीने वाचले जावे याचे भान मला ठेवावे लागले. हे करताना एक वाचक म्हणून आणि एक अभिनेता म्हणून सुद्धा एक श्रीमंत अनुभव होता....अशा शब्दांत प्रतिभावंत लेखक, अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी आॅडिओबुक्सच्या माध्यमातून गवसलेले 'पु.ल' उलगडले. पुलं आणि सुनिताबाई देशपांडे यांच्या कलाकृतींचा श्रवणीय आनंद रसिकांना 'ऑडिओबुक्स'च्या माध्यमातून घेता येणार आहे. त्यानिमित्त 'पुलं, सुनीताबाई आणि ऑडिओबुक्स : एक अनुभव या वातार्लापाचे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी आॅडिओबुक्सच्या वाचनप्रक्रियेत सहभागी झालेले दिलीप प्रभावळकर, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी आणि पु.ल.देशपांडे कुटुंबीय दिनेश आणि ज्योती ठाकूर, सतीश जकातदार, स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ, प्रसाद मिरासदार उपस्थित होते. पु.लंना बोजड लिहिणे कधीच शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या साहित्यावर आधारित कलाकृती सादर करताना पाठांतर करणे सोपे गेले. त्यांचे समृद्ध होणारे लिखाण मला अभिनयासाठी उपयोगी पडले असे सांगून प्रभावळकर म्हणाले, पु.लं.च्या चैतन्यशील, वैचारिक आणि गंभीर लिखाणाचा अत्युच्च अनुभव मला ऑडिओ बुक करताना पुन्हा एकदा आला. त्यांच्या साहित्याशी जवळीक असल्याचा फायदाही ऑडिओ बुक वाचताना झाला.डॉ.अरुणा ढेरे म्हणाल्या, ऑडिओ बुकच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा श्रवण संस्कृतीकडे वेगळ्या कारणांनी वळलो आहोत. वाचन करताना छापील शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन आपण वाचतो. परंतु ऑडिओ बुकसाठी वाचन करताना त्या शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा नाद, लयही उच्चरली जाते. त्यामुळे त्या शब्दाला एक अर्थ वलयप्राप्त होते. छापील कागदावर शब्द पूर्ण जिवंत नसतो परंतु वाचताना तो पूर्ण जिवंत होतो. सुनीताताईंच्या पुस्तकांचे ऑडिओबुकसाठी वाचन करताना त्या आत्मचिंतन करत आहेत अथवा स्वगत बोलत आहेत असे वाटते. त्यांच्या पुस्तकांचे वाचन करणे हा एक छान व शिकवणारा अनुभव होता असे सांगून त्या म्हणाल्या, चांगली पुस्तके रसिकांपर्यंत पोहचवणे हाच एकमेव उद्देश ठेवून वाचन केले मात्र,त्यामुळे माणूस किती समृद्ध होतो याचाही अनुभव यानिमित्ताने आला. आपल्या जगण्याबद्दल,मानवी संबंधाबद्दल अनेक गोष्टी शिकता आल्या. ------------------------------------------------------------------
एक वाचक आणि अभिनेता म्हणून 'श्रीमंत' अनुभव: दिलीप प्रभावळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 8:04 PM