पुणे: सरकारी नोकरदार, बागायती शेती, खासगी-क्षेत्रातील मोठे पगारदार तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी रेशनवरील स्वस्त धान्याचा हक्क सोडावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे. जेणेकरून ते धान्य गरजूंना देता येणार आहे. त्यामुळे सधन नागरिकांनी स्वत:हून स्वस्त धान्यावरील हक्क सोडावा; अन्यथा तपासणीत दाेषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शहरात तसेच जिल्ह्यात सध्या रेशनकार्डला आधार जोडणीचे काम सुरू आहे. जिल्हाभरात दुबार तसेच आधार न जोडलेल्या सुमारे ९० हजारहून अधिक लाभार्थी कमी केले आहेत. या मोहिमेत रेशनवरील धान्य घेत असलेल्या उच्च उत्पन्न गटातील नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. यातून केली जाणारी कारवाई टाळण्यासाठी आयकर भरणारे, तसेच उच्च उत्पन्न गटातील शिधापत्रिकाधारकांनी स्वत:हून पुढे येऊन आपली माहिती द्यावी, धान्यावरील हक्क सोडावा, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केला आहे.
पुरवठा निरीक्षकांमार्फत चौकशी
अनेक धनदांडगे लोक गरज नसताना तसेच त्यांची बाहेरून धान्य खरेदी करण्याची ऐपत असतानाही रेशनचे धान्य उचलत आहेत. धान्यावरील हक्क सोडण्यासाठी हे नागरिक स्वतःहून पुढे यावेत, अन्यथा पुरवठा निरीक्षकांमार्फत चौकशी करून स्वस्त धान्य मिळविण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती सादर करून शिधापत्रिका मिळविल्याबद्दल थेट कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांनीही माहिती द्यावी
नागरिकांनीही त्यांच्या माहितीतील अशा लोकांची माहिती पुरवठा विभागाकडे द्यावी. त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील. त्यासाठी गिव्ह इट ॲपचे अर्ज सर्व स्वस्त धान्य दुकानदारांकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात सहकार्य केल्यास गरीब व गरजू नागरिकांना प्राधान्याने धान्य उपलब्ध करून देण्यास मदत हाेईल, असेही सुरेखा माने सांगितले.
''श्रीमंतांनी धान्यावरील हक्क सोडावा. त्याचा वापर अन्य गरीब व गरजूंना देता येईल. याबाबत पुरवठा निरीक्षक तपासणी करत आहेत. त्यात आढळलेल्या दाेषींची नावे कमी करण्यात येणार आहेत. - सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे''