पुणे : नवीन वाहतूक कायदा व दंड महाराष्ट्रात लागू करू नये, खुला परवाना बंद करावा, टेम्पोला अधिकृत थांबे द्यावेत, ओला, उबेर बंद करावे अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी रिक्षा व टेम्पो चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर असंतोष मोर्चा काढला. या मोर्चामध्ये विविध फलक, चित्ररथाच्या माध्यमातून रिक्षा व टेम्पो चालकांच्या स्थितीची जाणीव करून देण्यात आली. रिक्षा व टेम्पो पंचायतच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. भवानी पेठ येथील कार्यालय पासून मोर्चाला सुरूवात झाली. महात्मा गांधी यांच्या चित्रासह वाहन चालकांचे रोजचे मरण-पुण्याच्या वाहतुकीचे काय आहे. धोरण, पुण्यात वाहनांची संख्या किती वाहतूक धोरणाची काय आहे नीती, काल होती वाहतूक नियंत्रण शाखा-आज झाली वाहतूक महसूल शाखा असे फलक रिक्षा व टेम्पो चालकांनी हातात घेतले होते. तसेच या परिस्थितीमुळे रिक्षा टेम्पो चालक आत्महत्येच्या उंबरठ्यावर असल्याची जाणीव करून देणारा चित्ररथ मोर्चात होता. एका टेम्पोवर तीन आसनी रिक्षा ठेवून तिच्या दर्शनी भागात गळफास लटकावून त्यावर दोन्ही बाजूने बळीराजानंतर आता आमचा नंबर लिहलेले फलक लावलेले होते. मोर्चाचे नेतृत्व नितीन पवार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी पवार यांच्यासह संपत सुकाळे, भरत गेडेवाड, गोरख मेंगडे, संतोष नांगरे, रवी पाटोळे,सुरेखा गाडे, आनंद बेलमकर आदी उपस्थित होते. पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदेही उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून निवडणुका होताच खुल्या परवान्यासह इतर मागण्यांबाबत बैठक बोलविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले.--योग्यता प्रमाणपत्रासाठी आळंदीत ट्रॅकरिक्षा टेम्पो या सारख्या प्रवासी वा मालवाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांना वार्षिक योग्यता प्रमाणपत्रासाठी दिवे येथील ट्रॅकवर जावे लागते. रिक्षा, टेम्पो सारख्या छोट्या वाहनांना ते अडचणीचे होत होते. पंचायतीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता आळंदी रस्त्यावरच २५० मीटरचा ट्रॅक निर्माण होत आहे. त्यामुळे रिक्षा टेम्पोसह वाहनधारकांना दिवे येथे जावे लागणार नाही, असे अजित शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केल्याची माहिती नितीन पवार यांनी दिली.
पुण्यात रिक्षा व टेम्पो चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर असंतोष मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 8:21 PM
विविध फलक, चित्ररथाच्या माध्यमातून रिक्षा व टेम्पो चालकांच्या स्थितीची जाणीव...
ठळक मुद्देयोग्यता प्रमाणपत्रासाठी आळंदीत ट्रॅक