पुणे : शहरातील काही रिक्षा संघटनांनी बाइक टॅक्सीला विरोध दर्शवण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी बेमुदत रिक्षा बंदची हाक दिली आहे. या बंदला आणि मागण्यांना रिक्षा पंचायतीचा पाठिंबा असला तरी बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शनिवारी जाहीर केले.
बाइक टॅक्सीच्या विरोधात रिक्षा संघटना एकत्र आल्या असून, पाच- सहा दिवसांपूर्वी काही रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी आढाव यांनी भेट घेत, २८ नोव्हेंबरपासून बेमुदत रिक्षा बंद आंदोलन करणार असल्याचे त्यांना सांगितले होते; पण २८ नोव्हेंबर हा महात्मा जोतिराव फुले यांचा स्मृतिदिन आहे. या दिवशी देशभरातून फुले प्रेमी पुण्यात येत असतात. या तारखेविषयी पुनर्विचार करा. तसेच तुम्ही आधी निर्णय घेऊन मग आंदोलनात सहभागी होण्याचा प्रस्ताव आणला आहे. तुम्ही तारीख पुढे- मागे करा आपण आंदोलन एकत्रितपणे करू, असे आश्वासन रिक्षा पंचायतीच्या वतीने देण्यात आले होते. त्याचप्रमाणे नुकताच कोरोना काळ गेला आहे. रिक्षा चालक थोडेसे सावरू लागले आहेत, अशावेळी बेमुदत बंद योग्य होणार नाही, अशी भूमिका त्यांच्यासमोर मांडण्यात आली होती. मात्र, २६ नोव्हेंबरपर्यंत बंदची घोषणा करणाऱ्या प्रतिनिधींकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बंदच्या संयोजकांना आधीच कल्पना दिली होती. त्याप्रमाणे बंदच्या मागण्यांना रिक्षा पंचायतीचा पाठिंबा आहे. मात्र, बेमुदत बंदमध्ये पंचायत सहभागी नाही, ही आमची भूमिका असल्याचे पंचायतीतर्फे कळवण्यात आले आहे.
त्यासाेबतच मागण्यांमध्ये बाइक टॅक्सी हीच एकमेव महत्त्वाची मागणी असल्यासारखे वाटते. त्याबरोबरच फायनान्स कंपन्या आजही रिक्षाचालकांचा करत असलेला छळ, सीएनजीचे वाढलेले दर, ई- व्हेइकलच्या मूळ धोरणातच बदल करण्याची मागणी या कशाचाच अंतर्भाव नाही. म्हणून केवळ एका मागणीसाठी बेमुदत बंद करणे योग्य होणार नाही, अशी भूमिका रिक्षा पंचायतीची आहे.