लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना टाळेबंदी काळात रिक्षा बंद असल्याने या कालावधीइतकी विम्याची मुदत वाढवून मिळावी या रिक्षा संघटनांच्या मान्यतेला हिरवा कंदील मिळाला आहे. भारतीय विमा नियमन प्राधिकरणाने तसा कायदा असल्याचे सांगत त्यासाठी रिक्षा व्यावसायिकांनी विमा कंपन्यांकडे अर्ज करावा, असे कळवले आहे. विमा कंपन्यांनी यासाठी नकार दिला होता.
आम आदमी रिक्षा संघटना तसेच रिक्षा पंचायत व अन्य संघटनांनी यासंदर्भातली मागणी केली होती. प्रत्येक रिक्षा व्यावसायिकाला रिक्षाचा विमा काढणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याची वार्षिक रक्कम साडेआठ हजार रूपये आहे. रिक्षाचा अपघात झाल्यास रिक्षा व्यावसायिकाला नुकसानभरपाई मिळते, अपघातात कोणी जखमी अथवा मृत झाल्यास आर्थिक मदत केली जाते.
कोरोना टाळेबंदीत रिक्षा व्यवसाय सलग चार महिने बंद असल्याने रिक्षा व्यावसायिकांना विम्याच्या वार्षिक मुदतीत चार महिन्यांची वाढ द्यावी अशी मागणी होती. विमा कंपन्यांकडून यासाठी नकार मिळाल्यावर आम आदमी रिक्षा संघटनेने भारतीय विमा नियमन प्राधिकरणाच्या हैद्राबाद येथील कार्यालयाबरोबर पत्रव्यवहार केला. त्यांनी याबाबत कायदा असल्याचे स्पष्ट केले. बंद कालावधीबाबत पूर्वसूचना दिल्यास तेवढा कालावधी वाढवून मिळतो, त्यासाठी विमा कंपनीकडे मागणी करावी असे त्यांनी कळवले.
त्याप्रमाणे आम आदमी रिक्षा संघटना त्यांच्या सदस्यांकडून विमा कंपन्यांकडे विम्याची मुदत वाढवून मिळावी, असे अर्ज लिहून घेत आहे. संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी सांगितले की विमा कंपन्यांनी आता नकार दिल्यास ते सर्व अर्ज विमा नियमन प्राधिकरणाकडे पाठवण्यात येतील. चार महिने मुदत वाढवून मिळाल्यास रिक्षा व्यावसायिकांना दिलासा मिळेल.