लोकमत न्यूज नेटवर्कआळेफाटा : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील रिक्षाचालकाला एकाने आळेफाटा परिसरात गुंगीचे औषध देऊन रोख रकमेसह सोन्याचा २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना बुधवारी दुपारी साडेबाराच्या वेळेला घडली. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रिक्षा चालवणारे दिलीप खैरे यांना एका भामट्याने आळेफाटा येथे कामानिमित्त जायचे असे सांगत त्यांची रिक्षा भाड्याने ठरवली. येथील चौकात रिक्षा थांबवत त्याने ज्युस पिऊ, असे सांगत खैरे यांना मोबाईल रिचार्ज करण्यास पाठवले. या संधीचा फायदा उठवत ज्युसमध्ये गुंगीचे औषध टाकले. ज्युस पिल्यानंतर खैरे यांना रिक्षा चौकातून नगर महामार्गाबे घेण्यास सांगितली. मार्केट यार्डजवळ खैरे बेशुद्ध झाले. यानंतर त्या इसमाने त्यांच्या गळ्यातील प्रत्येक पाच तोळ्याचा सोन्याचा गोफ व चैन बोटातील दोन तोळ्याच्या दोन अंगठ्या व खिशातील पाकिटातील रोख ४५ हजार रुपए असा दोन लाख वीस हजार रुपयांचा ऐवज लुटत पोबारा केला. दरम्यान ग्रामस्थांनी दिलीप खैरे यांना आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. नंतर नातेवाईकांनी नारायणगाव व पुणे येथे उपचारासाठी दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर खैरे यांना आपले दागिने व पैसे सदर इसमाने लुटल्याचे लक्षात आले.
आळेफाटा येथे रिक्षाचालकाला गुंगीचे औषध देऊन लुटले
By admin | Published: May 06, 2017 1:49 AM