धनकवडी : रात्रीच्या प्रवासादरम्यान रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांनी एका अभियंत्यास मारहाण करुन तब्बल एक लाख ६८ हजार रुपये काढून घेत त्याला रिक्षातून ढकलून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घाबरलेल्या अभियंत्यांने फिर्याद दाखल केल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रिक्षा चालक आणि त्याच्या दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी नंदकुमार वाघ (वय ४०,रा. गायमुख चौक, आंबेगाव बु) हे पिसोळे येथे डिझायनर इंजिनिअर म्हणून एका कंपनीत काम करतात. त्यांचा दररोज च्या प्रवास रिक्षातून होत असतो.
दरम्यान फिर्यादी गुरुवारी (दि.२०) रात्री सव्वा बारा च्या सुमारास खडी मशिन चौकातून रिक्षाने कात्रज बस थांबा येथे उतरले होते. तेथे आंबेगावला जाण्यासाठी रिक्षाची वाट पहात थांबले असता एक व्यक्ती त्यांच्या जवळ आला. त्याने रिक्षातून आंबेगाव येथे सोडतो असे सांगून बस थांब्याच्या पुढील बाजूस पार्क असलेल्या रिक्षात नेले. तेथे अगोदरच दोन व्यक्ती रिक्षामध्ये बसलेल्या होत्या. रिक्षामध्ये तीघे ही आरोपी बसल्यावर त्यांनी आंबेगावकडे जात असताना रिक्षातच वाघ यांना मारहाण करण्यास सुरवात केली.
त्यातील एकाने चेन. अंगठी आणि खिशातील जेवढे पैसे असतील तेवढे ते अन्यथा जीवे मारील अशी धमकी दिली. वाघ यांनी विरोध करताच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चेन आणि अंगठी जबरदस्तीने काढून घेण्यात आली. यानंतर पुढे राजवीर हॉटेलसमोर रिक्षातून खाली उतरवत लॅपटॉप आणि चार्जर असलेली बॅग हिसकावून घेण्यात आली. यानंतर वाघ यांना ढकलून देऊन आरोपी पळून गेले. या घटनेने वाघ यांना मोठा धक्का बसल्याने त्यांनी तक्रार दिली नव्हती. मात्र कंपनीच्या मालकांनी धीर दिल्यानंतर तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड करत आहे.