कोरेगाव भीमा : येथे दोन रिक्षाचालकांच्या झालेल्या शाब्दिक वादातून तिघांनी रिक्षाचालकाला दगडाने बेदम मारहाण केल्याने राजेंद्र मोरेश्वर मुंगसे (वय ५८ ,रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) यांचा रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अनिल राजेंद्र मुंगसे ( रा. आनाजीचा मळा वढू बुद्रुक) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे रिक्षा (नं. एमएच १२ क्यूआर ५२४२) वरील चालक राजेंद्र मुंगसे हे त्यांच्या रिक्षातून चाललेले असताना पाठीमागून आलेल्या एका रिक्षाचालकाशी शाब्दिक वाद झाला. त्यानंतर राजेंद्र मुंगसे पुण्याच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या रिक्षाचालकासह त्यामध्ये असलेल्या दोघा युवकांनी राजेंद्र यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने तोंडावर व डोक्याला बेदम मारहाण करून खून करून ते तिघे पळून गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून रिक्षाचा शोध घेतला असता एमएच १४ एलएस ०९१५ या रिक्षातील तिघांनी खून केल्याचे समोर आले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक विजय मस्कर, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, संतोष मारकड, शिवाजी चितारे, कृष्णा व्यवहारे, महेंद्र पाटील, जयराज देवकर यांनी पुण्यातील कुदळवाडी परिसरात जात रिक्षातील तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांनी रिक्षाच्या वादातून झालेल्या शाब्दिक वादातून सदर रिक्षाचालकाचा खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी सोमेश अशोक सरोदे (वय २७, रा. मोरे वस्ती चिखली, पिंपरी चिंचवड), दीपक राजू साठे (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी, पुणे), ज्ञानेश्वर कांतीलाल डुकळे (वय १९, रा. मोरे वस्ती, चिखली, पिंपरी चिंचवड) यांना अटक केली असून, त्यांना २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे व पोलिस हवालदार प्रताप कांबळे हे करत आहेत.