लष्कर (पुणे) : हेल्मेट न घातल्याबद्दल वाहतूक शाखेतर्फे चक्क रिक्षाचालकालाच दंड ठाेठावला असल्याचा प्रकार वाहतूक पाेलिसांकडून घडला आहे. शहरातील शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्ह चौकात टिपलेल्या दृश्याच्या आधारे ही ऑनलाइन दंडाची पावती देण्यात आली. लता गव्हाणे या महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी हा दंड आकारला. याबाबत रिक्षामालकाने विचारणा केली असता नजरचुकीने झाल्याचे सांगण्यात आले.
याबाबत रिक्षामालक, भीम छावा संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड यांना या दंडाची ऑनलाइन पावती मिळाली. ‘लोकमत’शी बोलताना गायकवाड म्हणाले की, माझी रिक्षा मी कार्यकर्त्याला चालवायला दिली आहे. रिक्षाचालक शुक्रवारी दुपारी सेव्हन लव्ह चौकातून प्रवासी वाहतूक करीत असताना दुपारी २.५१ वाजता त्यांनी रिक्षा (एमएच १२-टीयू ८४४९) चालवताना हेल्मेट घातले नसल्याचे कारण देत त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी लता गव्हाणे यांनी ५०० रुपये दंड आकारला आणि तो रिक्षामालक गायकवाड यांच्या मोबाइलवर आला.
याबाबत लगेचच वाहतूक विभागाकडे विचारणा केली असता नजर चुकीने ही घटना घडल्याचे वाहतूक कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावर एखाद्या सामान्य नागरिकांकडून नजरचुकीने चूक झाल्यास वाहतूक विभाग माफ करणार का? असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.