येरवडा (पुणे): आळंदी रस्त्यावरील म्हस्के वस्ती येथे रिक्षाचालकाचा बुधवारी पहाटे झालेल्या दुर्दैवी अपघातात उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. बाबा सकट (रा. गोसावीवस्ती, हडपसर) या रिक्षाचालकाचा अपघाती मृत्यूची नोंद विश्रांतवाडी पोलिसांनी केली होती. या गंभीर अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यावर या गंभीर अपघाताची उकल झाली आहे.
बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास रिक्षाचालकाचा गंभीर अपघात झाल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन पाहणी केली असता रिक्षाचालक बाबा सकट हा गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला. त्याला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघाताची सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यावर आळंदी रस्ता कडून विश्रांतवाडीकडे जाताना बाबा सकट यांची रिक्षा म्हस्केवस्ती येथे रस्त्याच्या मध्ये उभ्या असलेल्या दुधाच्या ट्रकला धडकली. अपघातानंतर ट्रकमध्ये बसलेल्या दोन व्यक्तींनी खाली येऊन अपघात झालेले रिक्षा ट्रक खाली अडकली असल्याचे पाहिले. त्यामध्ये रिक्षाचालक हा गंभीर जखमी अवस्थेत अडकलेला असताना ट्रक चालक व त्याचा सोबतचा इसम हे तेथून लगेच निघून गेले.
या घटनेनंतर अपघात नेमका कसा झाला हे पोलिसांना समजू शकले नाही मात्र सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यावर अपघाताचा खरा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सखोल तपास करून योग्य तो कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी दिली. गंभीर बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर ट्रक चालक व त्याच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीने अपघाताची माहिती पोलिसांना देणे अपेक्षित होते. किंवा गंभीर जखमी रिक्षाचालकाला तातडीची वैद्यकीय मदत करणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात अपघाताच्या घटनेनंतर ट्रक चालक व त्याचा साथीदार तेथून पसार झाले. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर अपघाताचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.