पुणे : दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात रिक्षाचालकाचा खून करुन पळून आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने मध्यरात्री पुण्यात पकडले.
सचिन रवींद्र मिलिनकरी (वय २४, रा. कृष्णा कॉलनी, गुलबर्गा), रेवना सिद्रप्पा दंगपूर (वय २५,रा. संतोष कॉलनी, गुलबर्गा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही रिक्षाचालक असून त्यांनी व त्यांच्या आणखी तीन साथीदारांनी जावेद नावाच्या एका रिक्षाचालकाचा खून केला होता. गुब्बी, छोटू, प्रकाश अशी या त्यांच्या तीन साथीदारांची नावे असून ते गुलबर्गा येथेच लपून बसले आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस कर्मचारी सचिन जाधव यांना माहिती मिळाली की, कर्नाटकातील गुलबर्गा येथे एका अनोळखी व्यक्तीचा खून करुन दोघे जण पुण्यात आले आहेत. त्यावरुन या आरोपीची माहिती करुन वरिष्ठ पोलीसनिरीक्षक नितीन भोसले पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, सचिन जाधव, रिजवान जिनेडी, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, प्रशांत गायकवाड, सुधाकर माने या पथकाने या आरोपींना लोहगाव येथे शोध घेऊन पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली.
दारु पित बसलो असताना झालेल्या वादात जावेद नावाच्या रिक्षाचालकाला मारहाण करुन त्याच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचून मारले व मृतदेह कलबुर्गी बिदर रेल्वे लाईनच्या कडेला टाकून पळून आले होते. बुधवारी दुपारीच ते लोहगाव येथील मित्राकडे आले होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधल्यावर त्यांनी १९ ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेचार वाजता कलबुर्गी बिदर रेल्वे मार्गाच्या जवळ एक अनोळखी मृतदेह आढळला असून वाडी रेल्वे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
पुण्यात पकडलेल्या आरोपींची माहिती कर्नाटक पोलिसांना दिली असून त्यांच्या तीन साथीदारांची माहितीही कळविण्यात आली आहे़ गुलबर्गा पोलीस हे लपलेल्या आरोपींचा शोध घेत असून या दोन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कर्नाटक पोलिसांचे पथक पुण्याकडे येत आहे. या पथकाच्या ताब्यात आरोपींना देण्यात येणार आहे.