पुणे :रिक्षा प्रवास करताना त्यात अगोदरच्या प्रवाशाची बॅग विसरली असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशाने ती पोलिसांकडे सुपूर्त केली़. याबाबतची माहिती अशी, प्रभात पोलीस चौकीत सकाळच्या वेळी शेखर कौंटकर आणि मोहन मलगुंडे हे काम करीत असताना एका रिक्षात प्रवाशाची बॅग विसरली असल्याचे अविनाश भोकरे यांनी सांगितले व पोलीस चौकीत बॅग आणून दिली़.
त्यांच्यासमोर शेखर कौंटकर यांनी बॅग उघडून पाहिल्यावर त्यात डायरी व ४ लाख रुपयांचा बेरर चेक आढळून आला़. डायरीमध्ये मिलिंद पटेल यांच्या मोबाईलवर संपर्क करुन पोलिसांनी चौकशी केली़. त्यांनी त्यांचा मित्र युवराज माने यांची बॅग रिक्षात विसरली असल्याचे सांगितले़. त्याप्रमाणे माने यांना प्रभात पोलीस चौकीत पाठविण्यास सांगितले़. युवराज माने यांनी चौकीत येऊन ही बॅग आपलीच असल्याचे खात्री पटवून दिल्यानंतर ४ लाख रुपयांच्या बेरर चेकसह बॅग त्यांच्या हवाली करण्यात आली.