वाट माझी बघतोय रिक्षावाला’ हे गाणे मध्यंतरी गाजले होते. त्यातील रिक्षावाला वर्षानुवर्षे उपेक्षितच आहे. शहरातंर्गत प्रवासी वाहतुकीची कितीतरी मोठी जबाबदारी रिक्षाचालक पार पाडत असतात. त्यासाठी त्यांना पैसे मिळतात हे खरे असले, तरी एक नागरिक म्हणून त्यांना शहराकडून काहीही दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. समाजसेवा करणारा घटक म्हणून समाजाकडून आमचा विचार व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. महापालिका ते सहज करू शकते, असे त्यांना वाटते. ‘आम्ही तुमचे मतदार आहोत, आम्हीही कर जमा करतो; मग आमचा विचार का करीत नाही?’ असा त्यांचा प्रश्न आहे. पुणे : ५० हजार गाड्यांमधून ५० हजार जण दिवसभरात २ लाखांपेक्षाही अधिक नागरिकांची शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात ने-आण करतात. पोस्टमनच्या खालोखाल फक्त त्यांनाच शहरातील सगळे गल्लीबोळ, मंगल कार्यालये, दवाखाने रस्त्यांच्या नावांसह पाठ असतात. भूक लागली तर गाडीतच खायचे, चहा प्यावासा वाटला तर एखाद्या टपरीवर थांबायचे. शहरासाठी इतके करूनही शहराकडून मात्र त्यांना काहीही मिळत नाही.पुणेरी टांगेवाला हा एके काळी सगळ्या पुण्याबाहेर चर्चेचा विषय होता. आता ती जागा रिक्षावाल्यांनी घेतली आहे. पुण्यातील रिक्षावाल्यांची संख्या ५० हजार आहे. रिक्षा मालक व चालक असे लक्षात घेतले, तर १ लाख जण या व्यवसायात आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या किमान ५ आहे, असे समजले तरी तब्बल ५ लाख जण या व्यवसायावर अवलंबून असल्याचे लक्षात येते. याशिवाय, रिक्षादुरुस्ती करणारे फिटर, त्यांच्या यंत्राचे सुटे भाग विकणारे व्यावसायिक यांनाही जमेस धरले तर या व्यवसायाचा व्याप किती मोठा आहे, हे समजते.रिक्षा पंचायतीचे वरिष्ठ पदाधिकारी नितीन पवार ही आकडेवारी देतात, त्या वेळी थक्क व्हायला होते. शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीची ही जबाबदारी सांभाळणारा हा समाजघटक पूर्णपणे उपेक्षित, दुर्लक्षित आहे. एखाद्या रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात सापडलेला ऐवज संबधिताला परत केला, तर त्याची बातमी होते. यावरून अन्य रिक्षाचालकांना समाजाची कोणती उपेक्षित नजर सहन करावी लागत असेल, याची कल्पना यावी. त्याविषयी कसलीही तक्रार न करता रिक्षा चालविण्याचे त्यांचे काम सुरू असते. दिवसा व रात्रीही उशिरापर्यंत. प्रवाशांकडून त्यांना हाकच ‘ए रिक्षा’ अशी मारली जाते. पैसे देताना ‘मीटर फास्ट दिसतोय’ अशी शंका व्यक्त होते. रिक्षा पासिंग करताना आरटीओमधून त्रास दिला जातो. गुन्हा एखादा रिक्षावाला करतो व त्याच्या वर्तुळातील सर्वांनाच पोलिसी हिसका सहन करावा लागतो. शिवाय, ‘रिक्षावाले ना? सगळे सारखेच!’ हा अपमानास्पद शेरा ऐकून घ्यावा लागतो. स्वत: मालकच रिक्षा चालवत असेल तरीही त्रास व एखाद्याने रिक्षा चालविण्यासाठी घेतली असले तरीही त्रासच! पेट्रोल वाढले व भाडे वाढवावे, अशी मागणी केली; लगेचच ‘भाव कमी झाल्यावर भाडे कमी करतात का?’ असा प्रश्न विचारला जातो. रस्ते खराब असल्यामुळे रिक्षा सतत काम काढते. देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढतो. कसे तरी शिल्लक ठेवलेले पैसे त्यात खर्च होतात; मात्र त्याचा कोणीही विचार करीत नाहीत. (प्रतिनिधी)
रिक्षाचालकांना हवे रिक्षाभवन
By admin | Published: November 18, 2016 6:38 AM