पुणे: रिक्षाचालकांंना १५०० रुपयांची मदत मिळवण्यासाठी अर्ज लिहून सादर करावा लागणारे सरकारी संकेतस्थळ सोमवारी दिवसभरही बंद होते. परिवहन आयुक्त कार्यालयाकडे विचारणा करणाऱ्या रिक्षाचालक संघटनांना यासंबंधी तांत्रिक उत्तरे मिळत होती.
कोरोना निर्बंधकाळात मदत म्हणून सरकार हे १५०० रुपये अधिकृत परवानाधारक रिक्षाचालकांना देणार आहे. त्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने हे संकेतस्थळ तयार केले आहे. मात्र, रविवारी संपूर्ण दिवसभर व आज सोमवारीही या संकेतस्थळावरून रिक्षाचालकांना काहीच करता येत नव्हते.
आधार कार्ड क्रमांक टाकला की, अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ठप्प होत असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. असे झाले की पुन्हा पहिल्यापासून सर्व माहिती भरावी लागत होती व आधार कार्ड क्रमांक टाकला की पुन्हा सर्व कोरे होत होते.
रिक्षा पंचायत व आप या संघटनांनी रिक्षाचालकांना अर्ज भरण्यासाठी मदत म्हणून शहरात ठिकठिकाणी विनामूल्य केंद्र सुरू केली आहेत. तिथेही हाच अनुभव येत आहेत, असे सांगण्यात आले.
आप रिक्षा संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी परिवहन उपायुक्त एस. एम. चव्हाण यांना याबाबत मोबाईलवरून विचारले. त्यांनी काही अडथळे येत असल्याचे मान्य करून क्रोम ऐवजी दुसऱ्र्या टूलवरून ही प्रक्रिया करून पाहण्याचा सल्ला दिला. रिक्षा चालकांना हे कधी समजणार, असा प्रश्न आचार्य यांनी केला.
आधीच रिक्षाचालक तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेने कंटाळले आहेत, सरकारने ही प्रक्रिया सुलभ करावी, तंत्रज्ञांना सांगून त्यातील दोष दूर करावेत, अशी मागणी रिक्षा पंचायत व आप तसेच अन्य संघटनांनी केली आहे.