पुणे : विविध मागण्यांसाठी काही रिक्षा संघटनांनी येत्या मंगळवारी (दि. ९) पुकारलेल्या बंदमध्ये रिक्षा पंचायत सहभागी होणार नाही. डॉ. बाबा आढाव यांनी बंदला पाठिंबा दिल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. कोणालाही न विचारताच रिक्षा पंचायतसह काही संघटनांची नावे बंदच्या पत्रकात छापण्यात आल्याची माहिती पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार यांनी दिली. त्यामुळे या बंदमध्ये रिक्षाचालकांनी सहभागी होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने मंगळवारी बंद पुकारला आहे. समितीने पुणे व पिंपरी चिंचवडमधील अनेक रिक्षा संघटना या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, पवार यांनी हा दावा खोडून काढला आहे. याबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या या बैठकीत आप रिक्षा संघटनेचे श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हा वाहतूक सेवा संघटनेचे संजय कवडे, रिपब्लिकन वाहतूक संघटनेचे अजीज शेख, क्रांती रिक्षा सेनेचे श्रीधर काळे,रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवडचे अशोक मिरगे यासंह विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे रिक्षा चालकांच्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या प्रश्नांविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. हे प्रश्न सोडविण्यासाठी उपस्थित संघटनांनी एकजूट व्यक्त केली. रिक्षा चालकांच्या प्रश्नांचे भांडवल करून आपली तुंबडी भरणाऱ्या संघटना, एजंट पुढाºयांचा निषेध करण्यात आला. याच एजंट संघटनांनी रिक्षा परवाना खुला करण्याची मागणी केली होती. परवाना खुला झाल्यावर यातील पदाधिकाऱ्यांनी रिक्षा विक्रीची एजन्सी सुरू केली. आता रिक्षांची संख्या प्रचंड वाढून रिक्षा सेवेचा बट्ट्याबोळ झाला त्यामुळे यांनी परवाना थांबवा अशी मागणी सुरू केली आहे. त्यांच्यामागे कोणतीही रिक्षा संघटना नसल्याने न विचारताच नावे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे रिक्षा पंचायतसह इतर रिक्षा संघटना या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती पवार यांनी दिली.-------------- आज निदर्शनेओला उबेरच्या बेकायदा वाहतूकीवर कारवाई , रिक्षा विमा हप्ता जोखमी एवढाच असावा, रिक्षा पासिंग मधील अडचणी, रिक्षा खुला परवाना बंद करणे अशा विविध मागण्यांसाठी रिक्षा पंचायतच्या वतीने सोमवारी (दि. ८) दुपारी अडीच वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत. यावेळी विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
बंदमध्ये रिक्षा पंचायत सहभागी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 4:38 PM
रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने मंगळवारी बंद पुकारला आहे.
ठळक मुद्देडॉ. बाबा आढाव यांनी बंदला पाठिंबा दिल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील अनेक रिक्षा संघटना या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा